मुंबई : सर्वसामान्य लोकांसाठी मुंबई लोकल कधी सुरु होणार हा सवाल लाखो मुंबईकरांना पडला आहे. आता लवकरच सर्वसामान्यांसाठी देखील लोकल रेल्वे सुरु होण्याची शक्यता आहे.   मुंबईतील लोकल  रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.


बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार,  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जराड,  बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल,  आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर यांच्यासह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह,  यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने गर्दी होणार नाही अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरु करता येईल यादृष्टीने विविध पर्यायांवर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.


कोरोनामुळं लॉकडाऊन सुरु झाल्यापासून सर्वसामान्यांना लोकल सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी आणि महिलांसाठी टप्प्याटप्प्याने लोकल सुरु करण्यात आली. मात्र सर्वसामान्य लोकांना अद्यापही लोकल प्रवासाची मुभा देण्यात आलेली नाही. लॉकडाऊन संपून आता बऱ्यापैकी व्यवहार सुरुळीत सुरु झाले आहेत. त्यामुळं सामान्यांसाठी लोकल सुरु करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे. व्यापारी असोशिएशनने देखील व्यापारावर परिणाम होत असल्याचे सांगत लोकल सुरु करण्याची मागणी नुकतीच केली आहे.


लोकल ट्रेनच्याबाबतीत केवळ सरकारी अधिकाऱ्यांवर सोपवून चालणार नाही. मंत्र्यांनीही यात जातीनं लक्ष घातलं पाहिजे. कारण सरकारी आणि खाजगी कार्यालयीन वेळा बदलून लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्याबाबत योजनाबद्ध पॉलिसी तयार करण्याची गरज आहे, अशी सूचना मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला केली होती.