मुंबई : कोविड संकट काळात अनेक दुर्दैवी घटना घडल्या. अशा घटनांमध्ये प्रसंगावधान राखून या देवदूतांनी सामाजिक बांधिलकी ठेऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवले आणि समाजासमोर मोठं काम उभं केलं. या देवदूतांचे अभिनंदन. या शब्दात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘एबीपी माझा’च्या ‘शौर्य पुरस्कार’ सोहोळ्यात शौर्य पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.


शौर्य, ध्रैर्य, प्रसंगावधान फक्त सैनिक, पोलीस, डॉक्टरच दाखवतात असं नाही तर सामान्य माणूसही संकट येताच शौर्य, धैर्य आणि प्रसंगावधान दाखवतो आणि संकटात सापडलेल्यांचे प्राण वाचवतो. अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या अशाच सामान्यांमधील देवदूतांचा एबीपी माझातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहोळ्यात सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला गृहमंत्री अनिल देशमुख, प्रख्यात अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर आणि अभिनेता रितेश देशमुख उपस्थित होते. या तिघांच्या हस्ते शौर्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले.


यावेळी बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोविड काळात जीवावर उदार होऊन काम करणारे डॉक्टर, पोलीस, मनपा कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांनी काम केल्याचे सांगत, कर्तव्यावर असताना 330 पोलीस शहीद झाल्याचेही सांगितले. कोरोना अजून गेलेला नसून आपल्याला काळजी घ्यावी लागेल असेही त्यांनी सांगितले.


एबीपी माझाच्या शौर्य पुरस्काराची सुरुवात तरुणांनी स्थापन केलेल्या ‘संगीत व्हेरियट’ या वाद्यवृंदाने सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी झाली. त्यानंतर एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी शौर्य पुरस्कारामागची कल्पना विशद करून सांगितली. राजीव खांडेकर म्हणाले, 2020 मध्ये कोरोनाने थैमान घालून वर्ष विस्कळीत करून टाकले. या संकटाच्या काळात वेगवेगळ्या माध्यमातून सकारात्मक काम करणाऱ्या मंडळींचा आज आपण इथे सत्कार करणार आहोत. माध्यम म्हणून आम्ही नकारात्मक, टोकाच्या विरोधाच्या बातम्या जशा देतो पण हे करतानाच समाजात जे काही चांगले घडते ते आवर्जून दाखवतोही. गेल्या चार वर्षांपासून सर्वसामान्य माणसांमध्ये दडलेल्या देवदूतांचा सन्मान करीत आलो आहोत. हे देवदूत एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये असं काही अद्भुत काम करून दाखवतात, जे परमेश्वरच्या हातून होणाऱ्या कामाच्या योग्यतेचे असते. त्यामुळे अशा मंडळींना आवर्जून शोधले पाहिजे आणि सन्मानित केले पाहिजे, त्यांचे कौतुक केले पाहिजे, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे यासाठी हा शौर्य पुरस्काराचा कार्यक्रम आहे. ही मंडळी देवाचा अंश असलेली मंडळी आहेत या शब्दात राजीव खांडेकर यांनी या देवदूतांना गौरव केला.


यानंतर संजना जेठू राव, कांता कलन, नीतिन नागोठकर, लता बनसोडे, पोलीस नाईक संजय चौगुले, गजराबाई, किशोर लोखंडे आणि नावेद दुस्ते यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विजेत्यांनी यावेळी आपल्या मनातील भावनाही व्यक्त केला.


पुरस्कार प्रदान केल्यानंतर मनातील भावना व्यक्त करताना उर्मिला मातोंडकर यांनी, मला या कार्यक्रमाला बोलावल्याबद्दल एबीपी माझाचे अभिनंदन असे म्हणत, मी जग चालवतो या मानवाच्या भ्रमाचा भोपळा 2020 ने फोडला. कोविडमुळे वाताहात झाली. अनेक शब्दांचे अर्थ बदलले. शौर्य शब्दाचाही अर्थ बदलला. मनुष्याचे मुनष्याप्रती जे प्रेम असते, आपुलकी असते त्याऊपर या आयुष्यात काहीही नसते. निसर्गापुढे झुकावे लागते ही शिकवण मनाशी कवटाळून आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे. यानंतर उर्मिला यांनी, ‘किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्या, जीना इसी का नाम है’ या गाण्याच्या ओळी म्हणत जीवनाचे मर्म सांगितले.


रितेश देशमुख यावेळी बोलताना, शौर्य म्हणजे काय? शौर्य म्हणताच भारतीय सेना, पोलीस डोळ्यासमोर येतात. कोविड काळात मनपा कर्मचारी आणि डॉक्टरांनी जे धैर्य दाखवले तेसुद्धा शौर्यच आहे. ते पुढे म्हणाले, दैनंदिन जीवनात जेव्हा सामान्य माणसापुढे संकट येते तेव्हा तो एका उंबरठ्यावर उभा असतो. आता काय करायचे, हो की नाही असा प्रश्न त्याच्यापुढे उभा राहातो आणि त्यावेळी जेव्हा तो धैर्य दाखवत ‘हो’ म्हणतो त्याला आपण शौर्य म्हणतो. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जेव्हा एखादी व्यक्ती पुढे येते आणि काहीतरी अशी गोष्ट करतो त्यामुळे एखाद्याचा जीव वाचतो. सिनेमातील आमचे शौर्य कॉस्मेटिक असते. हे शौर्य रियल लाईफ आहे. मी एबीपी माझाचं कौतुक करतो. अशा कार्यक्रमांमुळे सकारात्मक गोष्टी करण्यास अनेक प्रवृत्त होतील. मला या कार्यक्रमाला बोलावले हे माझे भाग्य असेही रितेश देशमुख यावेळी म्हणाले.


कार्यक्रमाचे सूत्र संचालन एबीपी माझाची अँकर ज्ञानदा कदमने केले.


पुरस्कार विजेत्यांचा थोडक्यात परिचय


संजना जेठू राव
पालघरच्या विक्रमगड तालुक्यातील कर्हे गावातील आठ वर्षांची जागृती संध्याकाळी 5.30 सहाच्या दरम्यान पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली होती. पाण्याचा हंडा भरता भरता तिचा पाय घसरला आणि ती विहिरीत कोसळली. तिथून काही अंतरावर असलेल्या 14 वर्षांच्या संजनाच्या लक्षात ही बाब आली आणि तिने तात्काळ विहिरीकडे धाव घेतली. जागृती विहिरीत एका दगडावर थरथरत उभी होती. संजनाने तिला धीर दिला आणि विहीरीत उतरून जागृतीला खांद्यावर घेत वर आणले होते.


कांता कलन
माहीम येथे फुटपाथवर राहाणाऱ्या कांत कलन फूल विकून चार जणांचा संसार सांभाळतात. मुंबईत पावसाने थैमान घातले होते आणि रस्त्याची नदी झाली तेव्हा पाणी ओसरावे म्हणून त्यांनी गटारावरचे झाकण काढले आणि त्यात गाड्या पडू नयेत म्हणून त्या मॅनहोलजवळ कोसळत्या पावसात पाय रोवून आठ तास उभ्या राहिल्या आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना धोक्याची जाणीव करून देऊ लागल्या.


नितीन नागोठकर
दादरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडणारे कर्मचारी. कोरोना काळात कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक येत नसल्याने त्यांनी अडीच हजार अनाथ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. याच दरम्यान त्यांनाही कोरोनाची लागण झाली. मात्र, उपचारानंतर हा अवलिया पुन्हा एकदा त्याच जोमाने कर्तव्यावर परतला होता.


लता बनसोडे
एमएसएफ महिला जवान लता बनसोडे ग्रँट रोड स्टेशनवर ड्युटीवर असताना प्लॅटफॉर्मवरुन चालणारा एक गृहस्थ चक्कर येऊन थेट रुळावर कोसळला. ही बाब लक्षात येताच लता बनसोडे यांनी तडक त्यांच्याकडे धाव घेतली. रुळावर उतरुन त्यांना सावरत असतानाच समोरुन वेगात येणारी लोकल थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. सुदैवाने मोटरमनने प्रसंग पाहून लोकलचा वेग नियंत्रणात आणला आणि मोठा धोका टळला.


पोलीस नाईक संजय चौगुले
पोलीस नाईक संजय चौगुले यांच्यामुळे सोलापूर महामार्गावर एक मोठा अपघात टळला. सोलापुरातील सावळेश्वर टोल नाक्यावर ते कर्तव्यावर असताना एक गॅस टँकर त्यांच्या दिशेने येताना त्यांना दिसला. टँकरकडे पाहाताच काहीतरी गडबड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. निरखून पाहिल्यानंतर त्यांना जाणवले की टँकरचा चालक बेशुद्ध असून टँकर नियंत्रणाबाहेर आहे. 30 किमी वेगात असलेल्या या टँकरमागे धावत जाऊन त्यांनी चालकाच्या दिशेने टँकरमध्ये प्रवेश केला. चालकाला बाजूला करून टँकर थांबवला. जर वेळीच संजय चौगुले यांनी प्रसंगावधान दाखवले नसते तर मोठा अपघात झाला असता तो त्यांनी टाळला.


गजराबाई
नातीला मृत्यूच्या जबड्यातून सोडवून साठ वर्षांच्या गजराबाईंनी सोडवून आणण्याची करामत केली होती. नाशिकजवळच्या शेवगे दारणा नावाच्या छोट्याशा खेड्यात चार वर्षांची समृद्धी घराबाहेर खेळत होती. तिच्यापासून काही फुटांवर बिबट्याच्या रुपात काळ उभा होता. बिबट्याने समृद्धीच्या दिशेने झेप घेतली. बिबट्या समृद्धीचा घास घेणार तोच गजराबाई धावून आल्या आणि त्यांनी बिबट्याच्या जबड्यातून समृद्धीला बाहेर खेचलं. समृद्धीला घराच्या आत ढकललं आणि त्या बिबट्यासमोर वाघिणीसारख्या उभ्या ठाकल्या. गजराबाईंच्या धाडसाने शक्तीशाली बिबट्याने माघार घेतली आणि धूम ठोकली.


किशोर लोखंडे
बीड येथे राहाणारा किशोर गोवा महामार्गावर पोकलेन मशीन चालवण्याचे काम करीत होता. त्याचवेळी त्याला महाडमध्ये इमारत पडल्याचे समजले. किशोरला तडक तिकडे जाण्यास सांगितले. किशोर तिथे पोहोचला तेव्हा समोर दगड विटांचा डोंगर उभा होता आणि त्याखाली दबले होते काही जीव. त्या जीवांना वाचवण्यासाठी किशोरने तब्बल चाळीस तास पोकलेन मशीन चालवली. दगड विटांचा डोंगर उपसतच राहिला. त्याच्यामुळे अनेकांचे जीव वाचले.


नविद दुस्ते
समोर असलेली इमारत अवघ्या काही क्षणात कोसळणार आहे हे माहित असूनही इतरांना वाचवण्यासाठी नविद दुस्ते हिमतीने इमारतीत घुसला आणि इमारतीचा एक एक भाग ढासळत असतानाही त्याने जीवावर उदार होऊन लोकांना बाहेर येण्यासाठी ओरडून सतर्क केले. त्याने ३५ जणांचे प्राण वाचवले. मात्र याच दरम्यान इमारती कोसळली आणि इमारतीचा पिलार नविदच्या पायवर कोसळला. गंभीर जखमेमुळे त्याचा पाय कापून काढावा लागला. हे संकट कमी की काय म्हणून कोसळलेल्या इमारतीशेजारी त्याची इमारत असल्याने सुरक्षेच्या कारणावरून त्याला राहाते घरंही सोडावे लागले. कुटुंबासह तो रस्त्यावर आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्याला मदत करण्याचे आश्वासन या कार्यक्रमात दिले.