Mumbai Local News : ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यानच्या 5व्या आणि 6व्या मार्गीकेचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. दुपारी साडेतीन वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे कार्यक्रमस्थळी येण्यासाठी मुंबई लोकलने प्रवास करणार आहेत. 


आज पंतप्रधानांच्या हस्ते पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे लोकार्पण केले जाणार आहे. पावच्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे प्रवाश्यांना 36 अधिकच्या लोकल फेऱ्या उपलब्ध होणार आहेत. यातील 34 फेऱ्या वातानुकूलित असतील आणि 2 फेऱ्या सध्या लोकलच्या असतील. वातानुकूलित फेऱ्या सुरू करण्यासाठी एक एसी लोकल सजवण्यात आली आहे. या एसी लोकलला पंतप्रधान आणि रेल्वेमंत्री हिरवा झेंडा दाखवतील. तसेच, या एसी लोकलला रंगबिरंगी फुलांच्या माळा लावण्यात आल्या आहेत. 







एसी लोकलचे दर कमी होणार? 


सध्या मुंबईतील मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर सुरू असलेल्या एसी लोकलला हवा तसा प्रतिसाद मिळत नाहीय. त्यामुळं एसी लोकलचे दर कमी करण्याचे प्रयत्न रेल्वे बोर्डाकडून सुरू आहेत. याबाबतची घोषणा आजच्या लोकार्पण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः करू शकतात असं बोललं जातंय. 


पाचव्या-सहाव्या मार्गिकेचा फायदा काय? 


आतापर्यंत कल्याण ते दिवा आणि ठाणे ते कुर्ल्यापर्यंत पाचवी आणि सहावी मार्गिका झाली आहे. ठाणे ते दिवा पाचव्या सहाव्या मार्गिकेचं काम गेली दहा वर्षे रखडलं होतं. मार्च 2019 अंतिम मुदत असतानाही त्यात अनेक वेळा बदल झाला होता. त्यानंतर जून 2021 ही अंतिम मुदत ठरवण्यात आली होती. पण कोरोना आणि परिणामी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कमी मनुष्यबळ आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे या कामात पुन्हा अडथळा आला. त्यामुळे आता मार्च 2022 च्या आधी ही मार्गिका पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.


ठाणे ते दिवा पाचव्या, सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी 4 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी असा 72 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हे काम पूर्ण होताच 6 फेब्रुवारीपासून ही मार्गिका खुली होईल. त्यामुळे मेल, एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होईल आणि लोकलचे वेळापत्रकही सुधारण्यास मदत मिळेल, असं अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रवी अग्रवाल यांनी सांगितलं आहे. 


दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा