मुंबई : जानेवारीपासून मुंबई लोकल सुरु करण्याचा विचार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे सरकार मुंबई लोकल सुरु करण्याचा विचार करत असून यासंदर्भात तयारीही सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार, असा प्रश्न सध्या सर्वांच्याच मनात आहे. अशातच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई लोकल संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.

Continues below advertisement


मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बोलताना सांगितलं की, "मुंबई आणि महाराष्ट्राची कोरोना स्थिती हळूहळू पूर्वपदावर आलेली आहे. मला वाटतं की, लोकल सुरु होण्यासाठी आणखी थोडा वेळ जाईल. पण जानेवारीमध्ये लोकल सुरु करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही." पुढे बोलताना ते म्हणाले की, "डिसेंबरचे साधारण 15 दिवसांमध्ये घटती कोरोनाची रुग्ण संख्या, तसेच नव्या रुग्णांची संख्या लक्षात घेतली जाईल. तसेच कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती वर्तवण्यात येत होती. ती आता निवळली आहे. त्यामुळे 31 डिसेंबरनंतर नववर्ष, जानेवारीमध्ये आम्ही लोकल रुळावर आणू. तसेच सर्वसामान्यांची सेवा सुरु होईल हा विश्वास आहे."


दरम्यान, कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबई लोकल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी मुंबई लोकल सुरु करण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्यानं वकील, शिक्षक आणि महिलांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र अद्याप सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची दारं खुली करण्यात आली नाहीत. अशातच दिवाळीत अनेकांना लांबचा प्रवास केला, तसेच एकमेकांच्या घरी येणं जाणं झालं. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात होती. परंतु, आता राज्यासह मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे राज्य सरकार लोकल सुरु करण्यासंदर्भात गांभीर्यानं विचार करत आहे, असंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.