मुंबई : आता काही दिवसांतच पावसाला सुरुवात होणार असून मुंबई प्रशासनाची पावसाला सामोरं जाण्याची तयारी आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. याचं खरं उत्तर हे नाही असंच आहे. कारण धोकादायक इमारती आणि दरडींचं यावेळी सर्वेक्षणच (Mumbai Landslide Survey) झालेलं नाही. त्यामुळं मुंबईत पावसाळी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबई म्हणजे स्वप्नांची मायानगरी. इथं अनेकजण अनेक स्वप्नं घेऊन येतात. पण ती स्वप्नं गाठताना मुंबईत लोक अत्यंत धोकादायक जागी राहत असतात. कुणी विचारही करु शकणार नाही अशा ठिकाणी त्यांची वर्षेच्या वर्षे जातात. चेंबूरच्या गौतमनगरमधल्या डोंगराळ भागात अनेक लोक जीव मुठीत घेऊन जगतायत.
मुंबई महापालिकेनं काही दरडग्रस्त भागात धोकादायक घरं आणि इमारतींना नोटिसा दिल्या आहेत. पण या डोंगराळ भागात कोणताही इशारा दिला गेलेला नाही.
मुंबईतले धोकादायक भाग कोणते?
2021 च्या महितीच्या अधिकाराअंतर्गत मिळवलेल्या माहितीनुसार मुंबईत 327 दरडप्रवण क्षेत्रं आहेत. त्यात 22 हजार 483 पेक्षा जास्त कुटुंबांना पावसाळ्यात धोका असतो. मुंबई महापालिका मात्र 327 नाही तर 291 दरडप्रवण क्षेत्रं आहेत.घाटकोपर, विक्रोळी, पवई , असल्फा, चेंबूर, भांडुप या उपनगरांच्या डोंगराळ भागात धोकादायक वस्ती आहेत. मुंबईत मोडकळीस आलेल्या 188 इमारती धोकादायक म्हणून नोंदवलेल्या आहेत. मात्र फक्त 84 इमारतीतले लोक इमारतींबाहेर पडलेत.उरलेल्या 104 इमारतीत नोटिसा मिळूनही लोक तसेच राहत आहेत.
महापालिकेकडून नोटीस, पण लोक ऐकत नाहीत
मुंबईतल्या डोंगराळ भागात अनेक वर्षांपासून लाखो लोक राहतात. दर वर्षी महापालिका आणि सरकार पावसाळ्यापूर्वी त्यांना नोटिसा पाठवण्याची औपचारिकता करतं. त्यामुळं इथले रहिवासी चिडून आहेत. नोटीस देऊनसुद्धा लोक ऐकत नसल्यानं महापालिका प्रशासन हताश झाल्यासारखं वागतं.
धोकादायक इमारतींना, झोपड्यांना एस विभाग कार्यालयातर्फे सावधानतेच्या नोटिसा आधीच देण्यात आल्यात. त्यामुळे खबरदारी म्हणून संबंधित भागातील स्थानिक रहिवाशांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. स्थलांतर न करता तिथंच राहणाऱ्या रहिवाशांची जबाबदारी त्यांची स्वत:ची असेल. नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित अथवा वित्तहानी झाल्यास बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही.
मुंबईत साधारण पंचवीस हजार कुटुंब हे अशा डोंगराळ दरड प्रवण क्षेत्र आणि अतिधोकादायक इमारतीमध्ये राहत आहेत. त्यांना घराच्या बदल्यात घर हवंय.
ही बातमी वाचा: