मुंबई : मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावात सुधारणा करण्यात आली आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' असा शिवरायांचा पूर्ण उल्लेख नावात करण्यात आला आहे.

यापूर्वी मुंबईतील इंटरनॅशनल एअरपोर्टला छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हटलं जात होतं. मात्र आता त्यात 'महाराज' या शब्दाची भर घालण्यात आली आहे.

नागरी हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. महाराष्ट्रातील जनतेने यासंदर्भात कित्येक वर्षांपासून मागणी केली होती. ती अखेर पूर्ण झाल्याबद्दल प्रभूंनी महाराष्ट्रीय नागरिकांचं अभिनंदनही केलं. तसंच महाराष्ट्राच्या मागणीकडे लक्ष दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार व्यक्त केले आहेत.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत ही बातमी शेअर केली आहे. महाराष्ट्र सरकारची मागणी मान्य केल्याबद्दल त्यांनी प्रभू आणि मोदींचे आभार व्यक्त केले आहेत.