मुंबई : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) जाहीर करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील आयआयटी मुंबईने देशात सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये चौथ्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे. मागील वर्षी ही संस्था चौथ्या क्रमांकावरच असली तरी यंदा तिच्या गुणांकात भर पडली आहे. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या रँकिंगमध्ये 19व्या स्थानी आहेत. राज्यातील एकूण 12 शैक्षणिक संस्थांनी देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत पहिल्या 100 मध्ये स्थान मिळवलं आहे.


दरवर्षी केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाकडून हे रँकिंग जाहीर केले जाते. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाने 19वे स्थान (58.77) पटकाविले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च या पुण्याच्या संस्थेने 25 वे (55.43), मुंबईच्या होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटने 30 वे (53.20) तर मुंबईच्याच इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने 34 वे (51.70) स्थान पटकाविले आहे.


परीक्षा रद्द करा किंवा तयारीसाठी पुरेसा वेळ तरी द्या, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांची मागणी


यामध्ये सर्वोत्तम विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाने नववा क्रमांक (61.13) तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. यंदा सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मानांकनात एका क्रमांकाची सुधारणा झाली आहे. मुंबईच्या होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीला मागे टाकत 17व्या स्थानावरून 14व्या स्थानावर (56.04) झेप घेतली आहे. तर आयसीटीच्या मानांकनात घसरण होऊन 15व्या स्थानावरून 18व्या स्थानावर (54.10) समाधान मानावे लागले आहे. मुंबई विद्यापीठाच्या मानांकनात ही मागील वर्षीच्या तुलनेने सुधारणा झाली असून यंदा मुंबई विद्यापीठाने 65वे स्थान मिळविण्यात यश मिळविले आहे. मागील वर्षी सर्वोत्तम विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठ 81व्या स्थानावर होते.


अभियांत्रिकी संस्थांच्या क्रमवारीत महाराष्ट्रात मुंबईच्या आयआयटी बॉम्बेनेच 85.08 गुणांची कमाई करत प्रथम स्थान तर देशात तिसरे स्थान मिळविले आहे. आयसीटीने अभियांत्रिकी क्षेत्रात राज्यात 58.70 गुण मिळवून दुसरे स्थान तर नागपूरच्या विसवेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेने राज्यात अभियांत्रिकी क्रमवारीत तिसरे स्थान मिळविले आहे.


देशात या NIRF रँकिंगमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास या चेन्नईच्या संस्थेने प्रथम तर बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने द्वितीय तर नवी दिल्लीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्लीच्या शैक्षणिक संस्थेने तृतीय क्रमांक मिळविला आहे.


Ashish Shelar On ATKT Students | ATKT विद्यार्थ्यांसाठी आशिष शेलार आक्रमक