मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांनी आता एकतर परीक्षा रद्द करा किंवा आम्हाला परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ तरी द्या अशी मागणी मार्डच्या माध्यमातून प्रधानमंत्री कार्यालय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या कार्यालयाकडे पत्र पाठवून केली आहे.


वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षा मे महिन्याच्या मध्यावर प्रस्तावित होत्या. मात्र कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता त्या परीक्षा जून महिन्यांत ढकलण्यात आल्या. सध्या सगळेचं विद्यार्थी कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत परीक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळतं नसल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांची कामगिरी पाहून आम्हाला श्रेणी द्यावी अशी मागणी अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.


वैद्यकीय विद्यार्थ्यांची एप्रिलमध्ये अंतिम वर्षाची टर्म संपते. ही टर्म 36 महिन्यांची असते. परंतु एमसीआयकडून विद्यार्थ्यांची टर्म वाढवण्याचे आदेश देण्यात आले होते. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती अजूनही आटोक्यात आलेली नाही. कोरोना काळात रुग्ण तपासणी दरम्यान अनेक डॉक्टरांना कोरोनाची बाधा होते. त्यातून बरे होण्यासाठी काही दिवस लागतात. त्यामुळे सध्य स्थितीत आम्हाला कोरोनाबाधितांची सेवा करताना किमान ताण न घेता सेवा करता यावी अशी मागणी अंतिम वर्षातील डॉक्टरांनी केली आहे. अशा चिंतेच्या वातावरणात वाढत जाणारी कोरोनाबाधितांची संख्या आणि दुसरीकडे परीक्षांबाबतचा निर्णय यामुळे आम्ही हैराण झालो आहोत. तीन महिन्यांत कोरोनाचं संकट टळलं तरी आम्हाला अभ्यासासाठी वेळ मिळायला हवा असं विद्यार्थ्यांनी पत्रात नमूद केलं आहे.



याबाबत बोलताना केईएम मार्डचे अध्यक्ष दीपक मुंडे म्हणाले की, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करा अथवा विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ द्या. या मागणीसाठी आता लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालयातील आणि नायर रुग्णालयातील मार्ड संघटनेने देखील आम्ही करत असलेल्या मागणीला पाठिंबा दिला आहे. याबाबतचं पत्र देखील त्यांच्या वतीने देण्यात आले आहे. सध्या मुंबईत कोरोना व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण मिळत आहेत. ही परिस्थिती आणखी किती दिवस अशीच राहिल याबाबत अजूनही कल्पना करता येणार नाही. सध्या इतर राज्यातील देखील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्याबाबत मागणी केली आहे. याचं प्रकारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी देखील लवकरात लवकर परीक्षेबाबतचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. जर परीक्षा रद्द झाल्या तर विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळू शकेल. जर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय न झाल्यास निदान विद्यार्थ्यांचा विचार करुन त्यांना परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ तरी मिळू शकेल. सध्या पदवी आणि पदविका विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना देखील कोणत्याही दिवशी परीक्षांच्या तारखा जाहीर होतील याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळेच अचानक परीक्षा घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी हैराण झाले आहेत. त्यामुळे ना रुग्ण सेवा करता येतीय ना अभ्यास करता येतोय अशी विद्यार्थ्यांची परिस्थिती झाली आहे.


Medical Exam issue in Nashik | वैद्यकीय परिक्षा रद्द करा अन्यथा दोन पेपरमध्ये अंतर ठेवा; राष्ट्रवादीचं आंदोलन