Darshan Solanki Case : दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणी (Darshan Solanki Suicide Case) डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांकडे 'Psychological Autopsy' करण्याची मागणी केली आहे. यामुळे दर्शनच्या आत्महत्येचं नेमकं कारण शोधलं जाऊ शकते, आत्महत्या इतर तणावामुळे केली की मानसिक तणावामुळे किंवा आजारामुळे हे यातून स्पष्ट होऊ शकते असा दावा डॉ. हरीश शेट्टी यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी आयआयटी-मुंबईतील विद्यार्थी दर्शन सोळंकी याने आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा (Darshan Solanki Suicide Case) तपास अद्याप सरु आहे.


कशी होते 'Psychological Autopsy'ची प्रक्रिया?


Psychological Autopsy ही अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये पोलीस कोणताही तपास न करता याचा तपास मानसोपचारतज्ज्ञांकडून केला जातो. या प्रक्रियेत मृताच्या कुटुंबीयांना त्याच्या प्रकृतीविषयी विचारले जाते. संबंधित व्यक्तीच्या  वैद्यकीय नोंदी (Medical Records) काढल्या जातात. तो सोशल मीडियावर किती अॅक्टिव्ह होता आणि तो काय अपडेट करत असे, याचा तपास केला जातो. त्याला परीक्षेत किती गुण मिळायचे याचा तपासही या प्रक्रियेत केला जातो.


हे विच्छेदन इतर फॉरेन्सिक शवविच्छेदनाइतकेच महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा एखाद्याचा हृदयविकाराच्या झटक्याने किंवा कर्करोगाने मृत्यू होतो, तेव्हा शवविच्छेदनात मृत्यू कशामुळे झाला हे कळते. परंतु जेव्हा एखाद्याचा मृत्यू आत्महत्येमुळे होतो, तेव्हा त्याचे कारण काय होते हे Psychological Autopsy द्वारेच समजते.


भारतीय लोकांची मानसिक आरोग्याकडे पाहण्याची वृत्ती संकुचित आहे, लोकांना मानसिक आरोग्याबद्दल फारशी माहिती नसते. मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे झाले आहे. मानसिक तणावामुळेच बऱ्याचशा आत्महत्या होत असतात. 2019-20 वर्षादरम्यान आत्महत्या प्रकरणांमध्ये 10 टक्के वाढ झाली. तर, 2021-22 वर्षात आत्महत्येच्या प्रकरणात 7 टक्क्यांनी वाढ झाली.


'Psychological Autopsy'च्या मदतीने कळेल सत्य


डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी महत्त्वाची गोष्ट नमूद केली आहे. आत्महत्येच्या घटनांमध्ये कोणत्याही लोकांच्या बोलण्याला महत्त्व न देता विज्ञानाला अधिक महत्त्व द्यावे, असे डॉक्टरांनी पत्रात स्पष्ट केले आहे.


जातीभेदाच्या मनस्तापाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संघटनांचा आरोप


पवई पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला होता. परंतु, जातिभेदाच्या मनस्तापाला कंटाळून दर्शनने आत्महत्या केल्याचा आरोप काही संघटनांनी केला होता. मुंबई आयआयटीमधील 'आंबेडकर पेरियार फुले स्टुडंट सर्कल' या संघटनेने या संदर्भात पत्रक काढून दर्शन याने जातिभेदातूनच आत्महत्या केल्याचे म्हटले होते. कॅम्पसमध्ये अनुसूचित जाती-जमातीमधील विद्यार्थ्यांसोबत भेदभाव केला जात असल्याचा आरोप या संघटनेने केला. यातूनच दर्शन याने आत्महत्या केल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या संघटनेच्या म्हणण्यानुसार, मुंबई आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जातीभेद दिसून येतो. दलित-बहुजन विद्यार्थ्यांना जातिबद्दल आणि आरक्षण विरोधी बोलून हिणवले जाते. दर्शन सोळंकी याची आत्महत्या याच मनस्तापला कंटाळून झाली असल्याचा संशय या संघटनेने व्यक्त केला आहे. यानंतर पवई पोलिस देखील या आत्महत्येबाबत कसून तपास करत आहे.  


महत्त्वाच्या बातम्या:


MPSC : आयोगाकडे असलेली हॉल तिकिटं हॅकर्सपर्यंत कशी पोहोचली? डेटा फुटला नसल्याचा दावा कशाच्या आधारे?