मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या (Election) निकालावर सर्वच विरोधी पक्षांनी शंका उपस्थित करत निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं होतं. विशेष म्हणजे, शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सायंकाळी 6 नंतर वाढलेल्या 76 लाख मतदारांचा (Voting) आकडा संशयास्पद असल्याचे म्हटले होते. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash ambedkar) यांनी याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर 25 जून रोजी निकाल देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, आज प्रकाश आंबेडकर यांची याचिका फेटाळली आहे. तसेच, न्यायालयाचा वेळ वाया घालवला असं निरीक्षणही नोंदवलं आहे.  

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अनेकदा महाराष्ट्रातील निकालावर शंका उपस्थित केली होती, तर दोनच दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागूपरमधील मतदारसंघातील मतांची आकडेवारी शेअर करत प्रश्न उपस्थित केला होता. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही काँग्रेसला आकडेवारीसह प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्यावतीने 76 लाख मतदारांचा मुद्दा उपस्थित करत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, प्रकाश आंबेडकर यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याचिकाकर्ते आणि आमचा कालच्या कामकाजाचा वेळ वाया घातला, असे निरीक्षणही हायकोर्टाने निर्णय देताना नोंदवले आहे. त्यामुळे, गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वादावर आता न्यायालयाने आपला निर्णय स्पष्टपणे दिला आहे. 

विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 वाजल्यानंतर अचानक रहस्यमय पद्धतीने वाढलेल्या 76 लाख मतांबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. वंचित बहुजन आघाडीचे चेतन चंद्रकांत अहिरे यांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. पण, मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली आहे.  

न्यायालयाच्या निर्णयावर उद्या भूमिका मांडणार

न्यायालयाने निर्णय दिला असून चेतन चंद्रकांत अहिरे यांची याचिका फेटाळली आहे. न्यायालयाकडून हा निकाल अपलोड झाल्यानंतर नेमकं याचिका फेटाळण्याचं कारण काय हे पाहता येईल. त्यानंतरच, मी माझी प्रतिक्रिया देईल असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. उद्या 26 जून रोजी सकाळी 11.30 वाजता मी मुंबईतील कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधणार आहे, अशी माहितीही आंबेडकर यांनी दिली.

हेही वाचा

राष्ट्रवादीच्या बैठकीला संग्राम जगतापांची दांडी, अजित पवारांचा इशारा; आमदाराने दिलं स्पष्टीकरण