मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार संग्राम जगताप (Sangram jagtap) गेल्या काही दिवसांत माध्यमांमध्ये चर्चेत आहे. हिंदुत्त्ववादी भूमिका घेत अल्पसंख्यांक समुदायाला त्यांनी लक्ष्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यावरुन, अजित पवारांनी (Ajit pawar) देखील स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली. तसेच, आजच्या बैठकीत मी संग्रामला याबाबत बोलेन, तसेच आमचा पक्ष हा धर्मनिरपेक्ष असून सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारा असल्याचेही अजित पवारांनी स्पष्ट केले होते. मात्र, राष्ट्रवादीतील (NCP) आमदारांच्या बैठकीला संग्राम जगताप यांनी दांडी मारल्याने आमदार जगताप यांच्या मनात नेमकं काय चाललंय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर, आमदार संग्राम जगताप यांची कृती अजित पवारांची डोकेदुखी वाढवणारी ठरत आहे. 

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचं अजित पवारांचं विधान तर दुसरीकडे अजित पवारांनी बैठकीला बोलावून देखील आमदार संग्राम जगताप यांची राष्ट्रवादीच्या नियमित बैठकीला मंगळवारी दांडी पडल्याने जगताप यांच्या भूमिकेवरुन पुन्हा चर्चा होत आहेत. अजित पवारांनी संग्राम जगताप यांच्या कृतीबाबत आज झालेल्या आमदारांच्या बैठकीत स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. एकीकडे धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून आपण पुढे जात असताना एखाद्या धर्माबाबत वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह विधान पक्षातील आमदाराने करणे पक्षाला परवडणारे नाही, असे अजित पवारांनी स्पष्ट शब्दात सांगितले. संग्राम जगताप यांच्यासारखी कृती खपवून घेणार नसल्याचा इशारादी अजित पवारांनी आमदारांच्या बैठकीत दिला आहे. आपण स्वत संग्राम जगताप यांच्याशी बोलणार असून अशा प्रकारची वादग्रस्त विधाने का करत असल्याचा जाब विचारणार असल्याचेही ते म्हणाले. मात्र, आमदार जगताप यांनी बैठकीला दांडी मारल्याने जगतापांच्या मनात नेमकं काय चाललंय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. 

संग्राम जगताप यांचं स्पष्टीकरण

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अहिल्यानगर येथील आमदार संग्राम जगताप यांनी आजच्या बैठकीतील दांडीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आजच्या बैठकीला येणार नसल्याबाबत मी कळवलं होतं, सध्या दिंड्यां सुरू आहेत. वारकऱ्यांच्या सेवेमध्ये आम्ही आहोत, त्यामुळे बैठकीला जाता आलं नाही, असे स्पष्टीकरण संग्राम जगताप यांनी दिलं आहे. सातत्याने हिंदुत्वाचा मुद्दा मांडत अनेक आंदोलनामध्ये सहभागी होत जगताप यांनी अक्कलकोट येथे भाषणामध्ये केलेल्या वादग्रस्त वास्तव्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. जगताप यांच्या वक्तव्याबद्दल काही जणांनी अजित पवारांकडे तक्रार केली आहे, त्यावर अजितदादांनी देखील राष्ट्रवादी पक्ष धर्मनिरपेक्ष असून संग्राम जगताप यांच्याशी बोलून त्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेणार असल्याचे म्हटलं. मात्र, संग्राम जगताप आपल्या वक्तव्यावर ठाम असून वेगळ्या विचाराचे लोक तक्रार करत असतील तर त्या वक्तव्याबद्दल अजितदादांशी बोलू असं म्हटलं आहे.

हेही वाचा

राजू खरेंना उमेदवारी देणे ही आमची चूक; निवडून आलेल्या आमदाराबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून नाराजी