Mumbai Local : मुंबई लोकलमधून प्रवास करत असताना लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना 8 लाख रूपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिलेत. या तरुणाच्या आई व वडिलांना प्रत्येकी चार लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी असं मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या आदेशांत स्पष्ट केलंय.
काय आहे प्रकरण?
8 मे 2010 रोजी वडाळाहून चिंचपोकळीला जात असताना लोकलमधील गर्दीनं नासीर खान या तरूणाचा बळी घेतला. प्रवासी एकमेकांना ढकलत असताना नासीर अचानक लोकलमधून पडून बेशुद्ध झाला होता. उपचारादरम्यान त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आई-वडिलांनी नुकसानभरपाईसाठी रेल्वेकडे दावा दाखल केला होता. मात्र रेल्वे दावा प्राधिकरणानं हा दावा फेटाळून लावला. त्याविरोधात नासीरच्या आई-वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
न्यायमूर्ती फिरदोश पुन्नीवाला यांच्या एकलपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणीनंतर हायकोर्टानं रेल्वे प्राधिकरणाचा नुकसानभरपाई न देण्याचा निकाल रद्द केला. तसेच आठ आठवड्यात प्रशासनानं त्यांच्या बॅंक खात्यात प्रत्येकी चार लाख रुपये जमा करावेत, असे आदेश हायकोर्टानं जारी केलेत.
हायकोर्टाचा निकाल काय?
नासीर लोकलमधून पडला याची माहिती पोलिसांनी स्टेशन मास्टरला दिली नाही. त्यामुळे नासीरचा मृत्यू लोकलमधून पडल्यानंच झालाय हे सिद्ध झालेलं नाही, असा निष्कर्ष प्राधिकरणाने नोंदवला होता. मात्र हा निष्कर्ष हायकोर्टानं चुकीचा ठरवला. नासीर लोकलमधून पडल्यानंतर त्याला जे. जे. रुग्णालयात नेण्यात आलं होतं, त्याच्या नोंदीही आहेत. यावरुन स्पष्ट होते की नासीरचा मृत्यू हा लोकलमधून पडल्यानंच झालाय. तसेच लोकलमधून पडल्यानंतर नासीरजवळ कोणतीच वस्तू सापडली नाही. त्याच्याकडे रेल्वेचं तिकिटही नव्हतं, असा दावा प्रशासनानं केला होता. मात्र त्याच्याकडे लोकलचा मासिक पास होता, असं त्याच्या वडिलांनी सांगितलं.
ही बातमी वाचा: