मुंबई : आयसीआयसीआय बँक बेहिशेबी कर्जवाटप आणि मनी लाँड्रींग प्रकरणी अटकेत असलेल्या दिपक कोचर यांना अखेर दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी गुरूवारी दिपक कोचर यांना 3 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे.


आयसीआयसीआय बँकेनं व्हिडीओकॉन कंपनीला 394 कोटींचे कर्ज दिले होतं. 7 सप्टेंबर 2009 रोजी या कर्जाचा परतावा करण्यात आला होता. त्याच्या एकच दिवसानंतर म्हणजे 8 सप्टेंबर 2009 रोजी या रकमेतील 64 कोटींची रक्कम नुपॉवर रिन्युएबल्स या व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजमधील एका कंपनीला देण्यात आली होती. याच प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉन ग्रुप प्रमोटर वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे.


व्हिडीओकॉनचे वेणुगोपाल धूत यांना सशर्त जामीन मंजूर, ICICI बँक बेहिशेबी कर्जवाटप प्रकरण


दरम्यान वेणुगोपाल धूत आणि चंदा कोचर यांना मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. दीपक कोचर यांचा नोव्हेंबर महिन्यात मुंबई सत्र न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कोचर यांच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती प्रकाश नाईक याच्या समोर सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने राखून ठेवलेला निर्णय गुरूवारी जाहीर करत कोचर यांना 3 लाख रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला. ज्यात चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयासमोर गरज भासेल तेव्हा तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहणं, विना परवानगी देश सोडून जाऊ नये अशा अटी घातल्या आहेत.


ICICI बँकेचे माजी सीईओ चंदा कोचर यांना मुंबई सत्र न्यायालयाकडनं जामीन मंजूर