मुंबई : आयसीआयसीआय बँकनं केलेल्या बेहिशेबी कर्जवाटप गैरव्यवहार प्रकरणात शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं व्हिडीओकॉनचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांना 5 लाखांच्या वैयक्तिक जातमुचालक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे.


याप्रकरणी वेणुगोपाल धूत यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर शुक्रवारी न्यायाधीश ए.ए. नांदगावकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. या अर्जाची दखल घेत त्यांना पाच लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. त्यांनी ईडीला तपासात पूर्ण सहकार्य करावे, चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयासमोर ते बोलावतील तेव्हा हजर राहावे, देश सोडून जाऊ नये आणि पासपोर्ट पोलिसांकडे जमा करणे अशा अटीशर्तीवर हा जामीन मंजूर केला आहे. 


आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन कंपनीला 300 कोटींचे कर्ज दिलं होतं. 7 सप्टेंबर 2009 रोजी या कर्जाचा परतावा करण्यात आला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 8 सप्टेंबर 2009 रोजी या रकमेतील 64 कोटींची रक्कम 'नुपॉवर रिन्युएबल्स' या व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजमधीलच एका कंपनीला देण्यात आली होती. याच प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं आयआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉन ग्रुप प्रमोटर वेणुगोपाल धूत यांना नोटीस पाठवली होती. चंदा कोचर व वेणूगोपाल धूत यांच्या नावे कोर्टानं वॉरंट जारी केलं होतं. गेल्या सुनावणीत चंदा कोचर यांनी कोर्टात हजर राहत जामीन मिळवला होता. मात्र दिपक कोचर हे अजूनही जेलमध्येच आहेत.