मुंबई : सुरक्षेच्या कारणास्तव निवासी भागात फटाक्यांची खुलेआम विक्री करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. नियम मोडणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.


फटाक्यांची विक्री करणारे अनधिकृत स्टॉल्स आणि निवासी भागातील फटाक्यांचे स्टॉल्स यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश सर्वत्र लागू करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार रहिवासी भागात फटाके विक्रीला पूर्णपणे बंदी घालावी आणि ज्यांचे विक्री परवाने निवासी भागात आहेत त्यांचे परवाने तातडीने रद्द करण्यात यावे, असं कोर्टाने सांगितलं आहे.

फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का? : राज ठाकरे


नवीन परवाने न देता जे परवाने जारी केले आहेत, ते 50 टक्क्यांपर्यंत आणा असे निर्देशही न्यायालयाने जारी केले आहेत. या सर्व प्रक्रियेवर पोलिसांनी लक्ष ठेवून त्यांच्या अधिकारानुसार बेकायदेशीर दुकानांवर कारवाई करावी असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

मुंबईतील मालाड भागातील फटाक्यांची दुकाने ही खूप वर्ष जुनी असून ती पुन्हा सुरु करण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी, अशी विनंती मालाड फायरवर्क्स वेल्फेअर असोशिएनने उच्च न्यायालयात केली होती. त्यांची विनंती अमान्य करत हायकोर्टानं हे निर्देश जारी केले आहेत.

फटाकेबंदीचा निर्णय का?


फटाकेबंदीला आमचा विरोध आहेच, असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे. दिवाळीचा सण जसा साजरा करतात, तसा लोकांनी साजरा करावा, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. हिंदू सण साजरे करण्यावरच बंदी का येते, असा प्रश्न उपस्थित करत ‘आता फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का?’ अशी तिरकस प्रतिक्रिया राज यांनी दिली.

दुसरीकडे, फटाकेबंदीच्या मुद्द्यावरुन शिवसेनेतही दुफळी माजली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन फटाकेविक्रीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यावर आक्षेप घेतला.

फटाक्यांवर अनेकांचा रोजगार अवलंबून आहे आणि फक्त भारतातच नाही तर जगात फटाके आहेत. त्यामुळे फटाकेविक्री बंद करु नका, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.

फटाकेबंदीवरुन शिवसेनेतच जुंपली, संजय राऊतांचा फटाकेबंदीला विरोध


अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीची राज्यभरात जोरदार तयारी सुरु आहे. राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ देण्यात आली आहे. मंत्रालय परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना शपथही देण्यात आली.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रातही यंदा फटाक्यांविना दिवाळी साजरी होणार?

राजधानी दिल्लीतल्या फटाकेबंदीचे पडसाद महाराष्ट्रातही?