फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का? : राज ठाकरे
एबीपी माझा वेब टीम | 10 Oct 2017 05:17 PM (IST)
दिवाळीचा सण जसा साजरा करतात, तसा लोकांनी साजरा करावा, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.
मुंबई : फटाकेबंदीच्या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. हिंदू सणांवरच बंदी का, असा सवाल उपस्थित करत फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का? अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे. दिवाळीचा सण जसा साजरा करतात, तसा लोकांनी साजरा करावा, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. मात्र वयोवृद्ध नागरिकांना जिथे त्रास होतो, तिथे फटाके वाजवताना काळजी घेतली जावी. परंतु वर्षानुवर्षे साजऱ्या होणाऱ्या सणांवर बंधनं यायला लागली, तर सर्वच सण कायमस्वरुपी बंद करा आणि सर्व सणांच्या सुट्ट्याही रद्द करा, अशी मागणीही राज ठाकरे यांनी केली. फटाकेबंदीला आमचा विरोध आहेच, असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. हिंदू सण साजरे करण्यावरच बंदी का येते, असा प्रश्न उपस्थित करत 'आता फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का?' अशी तिरकस प्रतिक्रिया राज यांनी दिली. खरंतर कोर्टाने अतिरेक्यांना सांगितले पाहिजे की इथे बॉम्ब फोडू नका, असं उपहासात्मक विधानही राज ठाकरेंनी केलं.