मुंबई : मुंबईतील डोंगरी भागातील केसरबाई नावाच्या चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत 40 ते 45 लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आलं आहे.


घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. परंतु दाटीवाटीचा परिसर आणि चंचोळ्या गल्ल्या यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. मानवी साखळी करुन दगड बाहेर काढले जात आहेत. मात्र ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचं आव्हान अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलिसांसमोर आहे. या दुर्घटनेनंतर वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

आज सकाळी साडेअकराच्या सुमारास या इमारतीचा भाग कोसळला. या इमारतीत 10 ते 15 कुटुंब राहत होती. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची संख्या जास्त आहे. आतापर्यंत दोन लहान मुलांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे कोसळलेली इमारत ही म्हाडाची आहे.

मुंबईतल्या 499 धोकादायक इमारतींची यादी जाहीर

ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यास प्राथमिकता : मुख्यमंत्री



दुर्घटनाग्रस्त इमारत 100 वर्ष जुनी आहे. म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतीत याचा समावेश नव्हता. इमारतीच्या पुनर्विकासासाठी विकासकाची नियुक्ती केली होती. विकासकाने काम वेळत केलं की नाही याची चौकशी केली जाईल. सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास प्राथमिकता आहे. इमारतीमध्ये 15 कुटुंब होती. त्यापैकी किती जण घरी होते आणि किती बाहेर याबाबत अद्याप समजलेलं नाही. परंतु सध्या सर्व लक्ष मदतकार्यावर आहे. हा अत्यंत दाटीवाटीचा भाग आहे. तिथे गर्दी न करता बचावकार्य चालले पाहिजे. जखमींना योग्य मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू : राधाकृष्ण विखे पाटील



या इमारत दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाल्याचं गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. "इमारत म्हाडाची असून ती धोकादायक नसल्याची माहिती समोर आली आहे. सर्व अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवलं आहे. 40 ते 50 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. बचावकार्य सुरु असून लोकांना वाचवणं ही आमची प्राथमिकता आहे. घडलेल्या प्रकाराची चौकशी केली जाईल," अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

"डोंगरीतील केसरबाई इमारतीचा भाग आज सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी कोसळला. प्राथमिक माहितीनुसार 40 ते 50 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. एनडीआरएफची तीन पथक, अग्निशमन दल, आपत्कालीन व्यवस्थापन पथक तसंच महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं," असं आवाहन मुंबई महापालिकेने ट्विटरद्वारे केलं आहे.


ही इमारत जुनी आहे. मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वीच धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली होती. परंतु त्या यादीत या इमारतीचा समावेश नाही. त्यामुळे ही इमारत नेमकी कशी कोसळली हे अद्याप समजू शकलेलं नाही.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर कौसर बाग इमारतीच्या शेजारील इमारतीही रिकाम्या करण्याचं काम सुरु झालं आहे.