मुंबई : राणीबागेतील कामांच्या कंत्राटाबाबत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख  (Mumbai Guardian Minister Aslam Shaikh) यांनी दुसऱ्यांदा पत्र लिहून आक्षेप नोंदवला आहे. राणीबागेतील प्राण्यांच्या अधिवास आणि पिंजरे बनवण्याच्या कामावरुन यापूर्वीही अस्लम शेख यांनी डिसेंबर 2021 मध्ये पत्र दिले होते. पहिल्या पत्रानंतर दीड महिना उलटल्यानंतरही मुंबई महापालिकेकडून उत्तर मिळाले नसल्याने त्यांनी हे दुसरे पत्र लिहिले आहे.  


राणी बागेतील कामाचे कंत्राट दोन ठराविक कंपन्यांनाच काम मिळावे म्हणून पायघड्या घालण्यात आल्याचा आरोप अस्लम शेख यांनी केला आहे. याबरोबरच प्राण्यांचे पिंजरे आणि अधिवास तयार करणे या कामासाठी पालिका प्रशासनाने निविदा मागवल्या आहेत. या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अस्लम शेख यांनी केला आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल ( BMC Commissioner ) यांना पत्र लिहून या प्रकरणी चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.


हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी आणि स्कायवे इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपन्यांनी आधीच जिजामाता उद्यानातील कंत्राटे मिळवलेली असताना आता पुन्हा याच दोन कंपन्या पुढे आलेल्या असल्यामुळे संशय व्यक्त होत आहे. या निविदा प्रक्रियेत जाणून बुजून आंतरराष्ट्रीय पातळीवरून निविदा मागवण्यात आल्या नाहीत. पालिकेतील अधिकारी स्थानिक कंत्राटदारांसोबत असून प्राणीसंग्रहालयाचा जास्तीत जास्त अनुभव असलेल्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना ठरवून दूर ठेवले जात असल्याचा आरोप अस्लम शेख यांनी केला आहे.


राणी बागेतील कामाची अंदाजित रक्कम काढण्यातही जाणूनबुजून घोळ केल्याचा आरोप अस्लम शेख यांनी आपल्या पत्रातून केला आहे.  याबरोबरच ही निविदा रद्द करून आंतरराष्ट्रीय पातळीवर पुनर्निविदा मागवाव्यात अशीही मागणी शेख यांनी केली आहे.


महत्वाच्या बातम्या


OBC Empirical Data : ओबीसींच्या इम्पिरिकल डेटासाठी प्रश्नावली; महसूल विभागामार्फत माहिती गोळा करणार