मुंबई : आज नेहमीप्रमाणे सकाळी साडेनऊ वाजता जीएसटी भवनमध्ये काम करणारे कर्मचारी आपल्या कामाच्या ठिकाणी यायला लागले होते. हे भवन नऊ मजली आहे. त्यामुळे लिफ्ट बरोबरच अनेक कर्मचारी या कार्यालयात जाण्यासाठी जिन्याचा वापर करत असतात. गेल्या दोन वर्षांपासून या इमारतीचं दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे इमारतीच्या जिन्याला अनेक ठिकाणी टेकू लावलेले आहेत. तर इमारतीच्या चहुबाजूने भिंतीला गिलावा लावण्यासाठी पायाड लावलेली आहेत. इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही. त्यामुळे जीव मुठीत घेऊनच हे कर्मचारी गेली दोन वर्ष या इमारतीमध्ये काम करत आहेत.


आज सकाळी नेहमीप्रमाणे काम सुरू झालं आणि अचानकच पावणे बारा वाजता नवव्या मजल्यावर आग लागल्याची बातमी सर्व कर्मचाऱ्यांना मिळाली. बातमी ऐकताच आठव्या आणि नवव्या मजल्यावर काम करणार्‍या महिला कर्मचाऱ्यांनी तातडीने या मजल्यावरून बाहेर पडायला सुरुवात केली. काही महिला कर्मचाऱ्यांनी ताबडतोब खाली येऊन या बिल्डिंगच्या फायर स्टेशनला इमारतीमध्ये आग लागल्याची माहिती दिली. मात्र, तोपर्यंत धुराचे लोट पाचव्या मजल्यापर्यंत यायला सुरुवात झाली होती. सर्व कर्मचारी आपला जीव मुठीत घेऊन मिळेल त्या वाटेने इमारती बाहेर यायला लागले होते. काम करताना नेहमीच ही इमारत कधी कोसळेल आणि आपला अंत कधी होईल, अशी भीती या कर्मचाऱ्यांच्या मनात होती. मात्र, आग लागल्यानं ही भीती अधिकच गडद झाली. आपला जीव वाचवावा आणि इतर कर्मचारी सुद्धा आपल्यासोबत इमारतीच्या बाहेर पडावेत यासाठी सर्वच कर्मचाऱ्यांची लगबग सुरू झाली आणि एकमेकाला निरोप देत सुरक्षित वाट पकडत हे सर्व कर्मचारी इमारतीच्या खाली आले.

महत्वाची कागदपत्रे आगीच्या भक्षस्थानी -

इमारतीच्या बाहेर आलेल्या कर्मचाऱ्यांनी जेव्हा जीएसटी भवनाकडे पाहिलं त्यावेळी या कार्यालयाचा आठवा आणि नववा मजला आगीच्या मगरमिठीत सापडला होता. आगीच्या ज्वाळा खिडक्यांमधून बाहेर यायला सुरुवात झाली होती. तर धुराचे लोट संपूर्ण माझगाव परिसरात पसरले होते. अग्निशमन दलाच्या कार्यालयाची माहिती देण्यात आली आणि काही मिनिटातच मुंबईतील वीसहून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवान ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करू लागले. आठव्या मजल्यावर आयुक्त आणि उपायुक्तांचे कार्यालय तर नवव्या मजल्यावर कार्यालयीन कामकाज पाहणारा विभाग आहे. या मजल्यावर महाराष्ट्रातील जीएसटी खात्यात, महसूल खात्यात काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कागदपत्रे, गोपनीय अहवाल, सर्विस बुक यासह अनेक महत्वाची कागदपत्र होती. ही सर्व कागदपत्रे जळाली अशी चर्चा या कर्मचाऱ्यांमध्ये होऊ लागली.

Mumbai Fire | स्वत:चा जीव धोक्यात घालून राष्ट्रध्वज आगीच्या ज्वाळांपासून वाचवणारा शिपाई

अनेकवेळा सांगूनही इमारतीच्या सुरक्षेबद्दल दुर्लक्ष -
ही इमारत दुरुस्ती करावी यासंदर्भात अनेकवेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं. मात्र, काम अतिशय धीम्या गतीने सुरू होतं. जिन्यातून जाताना टेकूचा आधार घेउन अंधारात वाट काढत आम्हाला कार्यालयात जावं लागत होतं. त्यामुळे आम्ही नेहमी भितीच्या छायेत वावरत होतो. जणू 'यम' आपल्यापाठी आहे. आपला कधी घात होईल, अशी भीती नेहमी आमच्या मनात असायची. गेली दोन वर्ष भीतीच्या छायेत आम्ही या कार्यालयात काम करत आहे. त्यात अधिक भर पडली आजच्या आगीमुळे. आजची आग पाहिली आणि छातीत धस्स झालं. जर आम्ही वेळेत बाहेर पडलो नसतो तर अनर्थ घडला असता, अशी प्रतिक्रिया येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली.

जीव वाचवण्यासाठी तळ मजल्यावर आलो -
या विभागात साधारण अडीच ते तीन हजार कर्मचारी काम करत आहेत. मात्र, आम्ही नेहमी बोलत असताना आपलं काम हे राम भरोसे आहे, असंच म्हणत असतो. कारण बिल्डिंग कधी पडेल याची गॅरंटी आम्हाला नाही. अशातच जीव मुठीत घेऊन आम्ही या कार्यालयात काम करत आहे. आज आग लागल्याचं कळताच आम्ही तातडीने आपला जीव वाचवण्यासाठी तळ मजल्यावर आलो. बघता-बघता आगीने रौद्र रूप धारण केलं होतं. या इमारतीचे फायर ऑडिट झाले असे म्हणतात. या विभागात काही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. असे असताना ही आग इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली कशी? असा प्रश्न आमच्या समोर पडलाय. आगीनं कमी वेळेत रौद्ररुप धारण केल्यामुळे आमच्या अंगाचा थरकाप उडाला. आमच्या कर्मचाऱ्यांची कागदपत्र जळाली आहेत. आता ती पुन्हा आम्हाला कशी मिळतील?

मुंबईतील जीएसटी भवनमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी

घरातल्यांना उत्तर देताना माझ्या डोळ्यातलं पाणी थांबता थांबत नव्हतं -

मी आठव्या मजल्यावरच काम करत असते. आज सकाळी ही नेहमीप्रमाणं मी माझ्या कामाला सुरुवात केली होती. सकाळी 50 ते 60 कर्मचारी-अधिकारी आठव्या मजल्यावर आपले दैनंदिन कामकाज करत होते. तर नवव्या मजल्यावर दुरुस्तीचे कामही सुरू होतं. अचानक नव्या मजल्याला आग लागल्याची माहिती आम्हाला कळली. ही आग आठव्या मजल्याच्या दिशेने वाढत असल्याचंही कळालं. त्यामुळे मी सगळ्या महिला कर्मचाऱ्यांना आग लागल्याची माहिती दिली आणि आम्ही महिला ताबडतोब आठव्या मजल्यावरून बाहेर पडायला सुरुवात केली. माझ्यासोबत काही 50 वयोगटातील महिला कर्मचारी देखील होत्या. त्यांना प्राधान्य देत आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना तळमजल्यावर नेलं. आमची पेन्शन, आमचे सर्विस बुक, आमच्या पगाराची कागदपत्र, गोपनीय अहवाल अशी अनेक महत्वाची कागदपत्र आठव्या मजल्यावर होती. आगीमुळं ही सर्व कागदपत्र जळाली आहेत असं मला वाटतं. सध्या अधिकारी यासंदर्भात कोणतीही माहिती देत नाहीत. कागदपत्रांत बरोबरच संगणक, फर्निचरही जळालेलं आहे. त्यामुळे आताच जळालेली कागदपत्र आणि माहिती हे पुन्हा रिकव्हर कशी होणार याची चिंता वाटते. तळ मजल्यावरून मी ज्या विभागात काम करत होते, त्या विभागाच्या खिडकीतून येणाऱ्या अग्निच्या ज्वाला बघताना मला खूप भरून आलं. आग लागल्याची बातमी माझ्या घरापर्यंत पोहोचली होती. घरातूनही फोन यायला सुरुवात झाली होती. घरातल्यांना उत्तर देताना माझ्या डोळ्यातलं पाणी थांबता थांबत नव्हतं, अशी प्रतिक्रिया देखील एका कर्मचाऱ्याने दिली.

Mumbai Fire | आग लागली त्यावेळी जीएसटी भवनात नेमक काय घडलं? कर्माचाऱ्यांशी बातचीत | ABP Majha