मुंबई : मुंबईत पुढील 24 तासांसाठी 15 टक्के पाणीकपात होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेने केलं आहे. तांत्रिक बिघाडामुळे मुंबई पूर्व उपनगरातील रहिवाशांना पुढच्या 24 तासात पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. मुंबई शहराला पाणी पुरवणाऱ्या पीसे आणि पांजरपोळ या पंपिंग स्टेशनच्या ठिकाणी विद्युत पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाल्याने पूर्व उपनगरात 15 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे, असं मुंबई महापालिकेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई उपनगरात कुर्ला ते मुलुंड याठिकाणी 15 टक्के पाणी कपात असेल. त्यामध्ये चेंबूर आणि मानखुर्दचाही समावेश असणार आहे. तब्बल 24 तासांसाठी ही पाणी कपात असेल, असं मुंबई महापालिकेच्या जल अभियंता कार्यालयाने जाहीर केलं आहे. 17 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 18 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत ही 15 टक्के कपात लागू राहणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या टी, एस, एन, एल, एम ईस्ट, एम वेस्ट यासारख्या विभागातील रहिवाशांना कमी दाबाने पाणी उपलब्ध होणार आहे.
अवघ्या काही दिवसातच उपनगरात दुसऱ्यांदा पाणी कपातीच्या संकटाला सामना करावा लागत आहे. याआधीही भांडूप एलबीएस मार्ग येथे 900 मीमी व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या दीर्घकाळ चाललेल्या कामामुळे उपनगरवासीयांची गैरसोय झाली होती. पूर्व उपनगरातील रहिवाशांना तीन दिवस पाण्याअभावी राहण्याची वेळ या कामामुळे ओढावली होती. त्यापाठोपाठ पुन्हा एकदा उपनगरवासियांवर पाणी कपातीचा सामना करण्याची वेळ येणार आहे.