Mumbai Goa Expressway Deadline : वर्ष 2023 अखेरपर्यंत मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण (Mumbai Goa Expressway) पूर्ण होण्याची घोषणा सरकारने केली होती. वर्ष संपल्यानंतर सरकार आश्वासन पूर्ण झाले नाही. आता मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी नवीन डेडलाईन सरकारने दिली आहे. आता, 31 डिसेंबर 2024 ही नवीन डेडलाईन सरकारने ठरवली आहे. हायकोर्टात सुनावणी दरम्यान सरकारने ही माहिती दिली. त्यामुळे कोकणवासियांचा यंदाचाही प्रवास खड्ड्यातूनच होणार आहे. प्रकल्पाला होणाऱ्या विलंबामुळे वाढणारा खर्च हा जनतेचाच पैसा असल्याची टिप्पणी हायकोर्टाने सुनावणी दरम्यान केली.
मुंबई गोवा महामार्गावरील दुरावस्थेबाबत हायकोर्टात दाखल जनहित याचिकेवर आज सुनावणी झाली. जवळपास 12 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र, कोकणवासियांचे हाल संपण्याची चिन्ह नाहीत. डिसेंबर 2023 चा मुहूर्त हुकल्याची प्रशासनाने आज हायकोर्टात कबुली दिली. वर्ष 2011 ला पूर्ण होणारा प्रकल्प अद्यापही प्रलंबित आहे.
शेवटी पैसा जनतेच्या खिशातून जाणार; हायकोर्टाचे ताशेरे
प्रकल्पाचा विलंब थेट मूळ खर्चावर प्रभाव टाकतो, शेवटी पैसा जनतेच्याच खिशातून जाणार असे हायकोर्टाने म्हटले. या वाढलेल्या खर्चाची जबाबदारी कोणाची? असा सवालही हायकोर्टाने यावेळी केला. नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारला हायकोर्टाने दिले. या निर्देशानंतर हायकोर्टानं ओवैस पेचकर यांची याचिका निकाली काढली. डिसेंबर 2024 पर्यंत प्रकल्प पूर्ण न झाल्यास याचिकाकर्त्यांना अवमान याचिका दाखल करण्याची मुभा कोर्टाने दिली.
10 वर्षात दोन हजार नागरिकांचा अपघातात मृत्यू
मुंबई गोवा महामार्गावरील अपघाती मृत्यूंचा आकडा दोन हजार पार गेला आहे. गेल्या 10 वर्षांत 1 हजार 685 अपघात झाले. या अपघातात आतापर्यंत दोन हजार दहा (2010) नागरिकांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने विधीमंडळ अधिवेशनात ही माहिती दिली होती.