मुंबई : महिलांना मासिक पाळीच्या दिवसात बाजूला बसवण्याची पद्धत आजही काही ठिकाणी सुरु आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या पद्धतीला फाटा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता तर नोकरदार महिलांना मासिक पाळी दरम्यान भरपगारी रजा देण्यात यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. मात्र प्रश्न हाच आहे की महिलांच्या दुखण्याला रजा हा एकमेव उपाय आहे का?


पाळीच्या दिवसांमध्ये होणाऱ्या त्रासाला झुगारणाऱ्या जाहिराती काही नव्या नाहीत. एकीकडे हे दुखरेपण बाजूला सारण्याचा संदेश दिला जात असताना, आता त्याच दिवसात महिलांना भरपगारी सुट्टी देण्याच्या मागणीनं जोर धरला आहे. शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी या मागणीचं पत्र राज्य सरकारला पाठवलं आहे.

सरकार याचा विचार करेल की नाही, माहिती नाही, पण मुंबईतल्या एका मीडियाबेस कंपनीनं आपल्या महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी पगारी रजा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं कंपनीत स्वागत होत आहे.

इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, तैवान, इटलीमध्ये स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात तीन दिवसांची भरपगारी रजा देण्यात येते. दक्षिण कोरियामध्ये तर ज्या महिला ही रजा घेणार नाहीत त्यांना अतिरिक्त वेतन मिळण्याचीही तरतूद आहे.

पूर्वी मासिक पाळीच्या दिवसात महिलेला अशुद्ध समजण्याची अघोरी प्रथा होती. कोपऱ्यात बसलेली बाई, ही अस्पृश्य समजली जायची. अनेक वर्षांच्या लढ्यानंतर हा समज आपल्या समाजानं मोडून काढला आहे. त्यामुळे आता दुखरेपणाचं कारण करुन त्या दिवसांमध्ये महिलेला घरी बसवणं कितपत योग्य आहे, याचाही विचार करावा लागेल.