Mumbai Girgaon Fire : मुंबईत गिरगाव चौपाटी येथे शनिवारी संध्याकाळी लागलेल्या आगीत दोन ज्येष्ठ नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला. गिरगावच्या निवासी इमारतीत लागलेली आग विझवण्यात दुसऱ्या दिवशी अग्निशमन दलाला यश आले. त्यानंतर इमारतीत दोन मृतदेह आढळले. मृतांमध्ये वृद्ध आई आणि मुलाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.


गिरगावात इमारतीला लागलेल्या आगीत आईला वाचवायला गेलेल्या मुलाचाही आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. नलिनी शाह (82 वर्ष) आणि व हिरेन शाह (60 वर्ष) अशी मृत आई आणि मुलाचे नाव आहे. गिरगाव चौपाटीवरील या इमारतीला शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्यानंतर शहा यांच्या घराच्या खिडक्यांमधून आगीचे लोळ बाहेर येऊ लागले. घटनेची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली.


अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून नऊ जणांना इमारतीबाहेर काढले. मात्र नलिनी आणि हिरेन शाह आगीत अडकल्याची माहिती समोर आली.   


या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या शाह कुटुंबातील नलिनी शाह नुकत्याच सैफी रुग्णालयातून परतल्या होत्या. त्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांचे नातेवाईक शाह यांच्या घरी आले होते. रात्री सर्व पाहुणे निघून गेल्यानंतर काही वेळातच इमारतीला आग लागली. नलिनी आणि हिरेन हे इमारतीमध्ये अडकले. बाहेर पडता न आल्याने त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. 


हिरेन यांनी घरातील इतरांना बाहेर निघण्यास सांगितले आणि मी आईला घेऊन येतो असे सांगितले. मात्र आईला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांचाही मृत्यू झाला असे शाह यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले.


हिरेनच्या तीन मुलांपैकी एकाने पाईपवरून तिसऱ्या मजल्यावरील अपार्टमेंटमधून खाली उतरला. कुटुंबातील इतर तीन सदस्य इमारतीच्या अगदी जवळ बांधकाम सुरू असलेल्या उंच इमारतीमध्ये फळी वापरून गेले. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांचा जीव वाचला. मात्र नलिनी आणि हिरेन यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.


ही बातमी वाचा: