मुंबई : अर्ध्या किमतीत डॉलर मिळवून देतो, असं सांगून एकाला तीन लाखांचा गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील दोन सदस्यांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. तर या गॅंगचा म्होरक्या मात्र फरार झाला आहे. इम्रान अन्सारी आणि फर्जाना अमीर उल्ला खान अशई दोन आरोपींची नावं आहे.
या गँगने तक्रारदार मोहम्मद अली यांना अर्ध्या किमतीत डॉलर मिळवून देतो, असं सांगितलं होतं. हे डॉलर घेण्यासाठी फिर्यादी तीन लाख रुपये घेऊन पवई पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तुंगा गावात आले होते. आरोपींनी प्रथम त्यांना डॉलरचं बंडल दाखवलं आणि हातचलखीने एका रुमालात ते बांधल्यासारखं केलं. त्यानंतर तो रुमाल फिर्यादीच्या हातात दिला आणि तीन लाख रुपये घेऊन त्या ठिकाणावरुन पळ काढला.
थोड्या वेळात मोहम्मद अली यांनी रुमाल उघडून पहिला असता त्यात फक्त वर-खाली डॉलर आणि बंडलच्या मध्ये कागद असल्याचं दिसलं. त्यांनी तातडीने याची माहिती त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्राला आणि पवई पोलिसांनी दिली. सुदैवाने मोहम्मद अली यांचा मित्र जावेदला या टोळीतील दोन सदस्य कंजूरमार्ग स्थानकात दिसले आणि त्याने ताबडतोड लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने त्यांना पकडलं.
पवई पोलिसांनी या दोघांना अटक करुन त्यांच्याकडून तीन लाख रुपये ताब्यात घेतले आहेत. दोघांवर याआधीही पवई, साकीनाका आणि जोगेश्वरी पोलिस ठाण्यात असेच गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांनी अजून किती जणांना असा गंडा घातला आहे त्याचा शोध पोलिस घेत आहेत.