मुंबई :  लाखो भाविकांचे आकर्षण असलेल्या लालबागचा राजा गणपतीची विसर्जन (Ganesh Visarjan) मिरवणूक उद्या निघणार आहे. यंदाच्या वर्षात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. ज्यांना लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाणं शक्य होत नाही, असे भाविक विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात, अथवा विसर्जन मार्गावरून दर्शन घेतात. त्यामुळे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठीदेखील अलोट गर्दी उसळते. लालबागच्या राजाच्या मिरवणुकीची (Lalbaugcha Raja Visarjan) वेळ मंडळाच्यावतीने जाहीर करण्यात आली आहे. 


गुरुवारी, 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता लालबागच्या राजाची (Lalbaugcha Raja) आरती होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता लालबागच्या राजाची राजेशाही मिरवणूक लालबाग मार्केटमधून निघणार आहे. यामध्ये कोळी बांधवांकडून मानवंदना दिली जाते. मंडळाच्या सुरुवातीच्या वर्षांपासूनचीही परंपरा आहे. शुक्रवारी, 29 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं प्रस्थान होणार आहे. त्यानंतर शेवटची आरती करून लालबागच्या राजाचे विसर्जन सोहळा अरबी समुद्रात सुरू होईल. सकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास समुद्राला भरती आहे. त्यावेळी लालबागच्या राजाचं विसर्जन अरबी समुद्रात होणार असल्याची माहिती मंडळाच्यावतीने देण्यात आली. 


लालबागचा राजा विसर्जन मार्ग कोणता?


श्री. गणेश नगर, लालबाग- गरमखडा जंक्शन उजवे वळण घेऊन नॉर्थ बॉन्ड डॉ. बी. ए. रोड ने भारतमाता जंक्शन भारतमाता जंक्शन येथून पुन्हा उजवे वळण घऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने गरमखाडा जंक्शनला उजवे वळण घेणार. पुढे साने गुरूजी मार्गाने चिंचपोकळी ब्रिज वरून आर्थर रोड नाका-ना. म. जोशी मार्गाने बकरी अड्डा- एस. ब्रीज चौक, भायखळा रेल्वे स्टेशन पश्चिम, घोडके चौक, अग्निशमन दलासमोरून खडा पारसी जंक्शन क्लेअर रोड- नागपाडा जंक्शन- दोन टाकी रोड-संत सेना महाराज मार्ग-सुतार गल्ली माधव बाग- व्ही.पी. रोड-ऑपेरा हाऊस- गिरगांव चौपाटी- गिरगांव असा विसर्जन मार्ग आहे. 


लालबाग-परळ परिसरातील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबई पोलिसांची व्यवस्था


मुंबईतील उत्सवाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरणगावात विसर्जनाच्या दिवशी मोठी गर्दी उसळते. ही बाब लक्षात घेता लालबाग-परळ भागात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबई पोलिसांनी विशेष व्यवस्था केली आहे. केवळ लालबाग-परळ भागात 300 सीसीटीव्हींची सोय केली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी सहा छेडछाडविरोधी पथक तैनात करण्यात आले आहेत. मोबाईल चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी 6 विशेष पथके असणार आहेत. 


तर, दहशतवादी विरोधी पथकाची एक टीमदेखील तैनात असणार आहे. संशयास्पद वस्तू आढळल्यास त्याच्या तपासणीसाठी 3 बॉम्बनाशक पथकेदेखील तैनात असणार आहेत. 


त्याशिवाय, तीन दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलिसांची 5 पथके, तीन सीसीटीव्ही व्हॅन, 2500 पोलीस मित्र कार्यकर्ते, सहा वॉच टॉवरची व्यवस्था करण्यात आली आहे.