मुंबई : मागील 10 दिवस मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सव (Ganesh Chaturthi) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आता, बाप्पाला निरोप देण्याची वेळ नजीक येऊ लागली आहे. गुरुवारी, 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या अनंत चतुर्दशीसाठी (Ananta Chaturdashi) मुंबई महापालिकेने (BMC) यंदाही जय्यत तयारी केली आहे. उद्या, गणेश विसर्जनासाठी (Ganesh Visarjan 2023) मुंबई महापालिकेचे 10 हजार कर्मचारी असणार आहेत. गणेश भक्तांच्या सोयीसाठी 71 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. त्याशिवाय, घरगुती आणि सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी 198 कृत्रिम तलावही तयार करण्यात आले असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवरही मोठी जबाबदारी गणेश विसर्जनाच्या दिवशी असते. गणेश विसर्जनाच्या दिवशी गर्दी टाळण्यासाठी मूर्ती विसर्जन वेळ नोंदणी ऑनलाईन करता येणार आहे. 


मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या गणेश मुर्तींच्या विसर्जनासाठी मुंबईतील चौपाट्यांवर 468 स्टीलच्या प्लेट टाकण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, तसेच छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणी 46 जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. समुद्रात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या गणेश भक्तांवर कोणताही दुर्दैवी प्रसंग येऊ नये तसेच नागरिकांच्या हितासाठी 764 जीवरक्षक मुंबई महापालिकेकडून तैनात करण्यात आले आहेत. महापालिकेकडून 48 मोटरबोटी तैनात केल्या आहेत. हार-फुले आणि इतर निर्माल्यासाठी 150 निर्माल्य कलशांसह 282 निर्माल्य वाहनांचीही सोय मुंबई महापालिकेकडून करण्यात आली आहे. 


>> मुंबई महापालिकेकडून आणखी कोणती व्यवस्था? 


मुख्य नियंत्रण कक्षासह प्रशासकीय विभागांच्या स्तरावर 188 नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.


सुरक्षेच्या दृष्टीने 60 निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत.


विविध ठिकाणी 68 स्वागत कक्ष तयार करण्यात आले आहेत.


आरोग्य विभागाकडून 75 प्रथमोपचार केंद्रांसह 61 रुग्णवाहिकादेखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.


प्रभावी प्रकाश योजनेसाठी ‘बेस्ट’ च्या सहकार्याने खांबांवर आणि उंच जागी सुमारे 1083 फ्लडलाईट आणि 27 सर्चलाईट लावले आहेत.


विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी 121 फिरती प्रसाधनगृहं सज्ज ठेवण्यात आली आहेत.


त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनासह प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहेत. 


>>गणेश विसर्जनासाठीची वेळेची नोंदणी करा...


गणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांना सुविधा व्हावी, विसर्जनस्थळी एकाच वेळी गर्दी होवू नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर मूर्ती विसर्जन वेळ नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुविधा करण्यात आली आहे. मायबीएमसी व्हॉट्सअप चॅटबॉट (MyBMC WhatsApp Chatbot) या 8999-22-8999 क्रमांकावरील चॅटबॉटमध्ये यंदा आपल्या नजीकचे गणेश मंडळ आणि मूर्ती विसर्जनस्थळ शोधण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.