Mumbai Fire Safety System : जर आपण अधूनमधून हॉटेल्समध्ये जात असाल तर हॉटेल-रेस्टॉरंटमधील आगीची (Fire) घटना तुमच्या जीवावर बेतू शकते. कारण मुंबईतील (Mumbai) तब्बल 92 हॉटेल रेस्टॉरंटमध्ये अग्नी सुरक्षा यंत्रणा (Fire Safety System) बंद असल्याचं समोर आलं आहे. अग्निशमन दलाने (Fire Brigade) या हॉटेल्सना नोटीस बजावली आहे. याशिवाय 40 व्यावसायिक इमारतींनाही नोटीस पाठवली आहे. पुढील 120 दिवसांत अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.


अग्निशमन दलाची तपासणी मोहीम


अग्निशमन दलाने संपूर्ण मुंबईत एकाच वेळी अचानक तपासणी मोहीम सुरु केली आहे. अग्निशमन दलाच्या मुंबईतील सर्व भागातील हॉटेल रेस्टॉरंटमध्ये अचानक केलेल्या पाहणीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या तपासणीत या तपासणीत मुंबईतील 92 हॉटेल्समध्ये अग्नी सुरक्षा यंत्रणा बंद असल्याचं समोर आलं. यानंतर अग्निशमन दलाने मुंबईतील 92 हॉटेल्स आणि 40 व्यावसायिक इमारतींना नोटीस पाठवली आहे. 


ग्राहकांच्या सुरक्षेसाठी अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करणं हॉटेल मालकांना बंधनकारक 


हॉटेल रेस्टॉरंट असो वा व्यावसायिक इमारती प्रत्येक ठिकाणी आग प्रतिबंधक उपाययोजना करणे संबंधित मालक आणि सोसायटी धारकांना बंधनकारक आहे. अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली की, नाही याची तपासणी करण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या माध्यमातून अचानक पाहणी केली जाते. त्याचाच भाग म्हणून मुंबई अग्निशमन दलाने मुंबईतील 440 हॉटेल, रेस्टॉरंटमधील अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित आहे की, नाही याची एकाच वेळी अचानक तीन आणि चार डिसेंबर दरम्यान संपूर्ण मुंबईभर तपासणी केली. या तपासणीत तब्बल 92 हॉटेल रेस्टॉरंटमध्ये अग्नी सुरक्षा यंत्रणा बंद असल्याचे निदर्शनास आलं. त्यानंतर 92 हॉटेल रेस्टॉरंट मालकांना नोटीस बजावण्यात आली. 


40 व्यावसायिक इमारतींनाही नोटीस


तर दुसरीकडे मुंबईतील 88 व्यावसायिक इमारतींची सुद्धा यामध्ये पाहणी करण्यात आली. यामध्ये 40 व्यावसायिक इमारतींमध्ये सुद्धा अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या 40 व्यावसायिक इमारतींना सुद्धा अग्निशमन दलाने नोटीस बजावली आहे. या हॉटेल रेस्टॉरंट मालकांना तसंच इमारतीच्या मालकांना अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. पुढील 120 दिवसांत ही यंत्रणा कार्यान्वित केली नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.