Mumbai Fire Update : ताडदेव भागातील भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या इमारतीमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 22 जण जखमी झाले असल्याची माहिती आहे.  इमारत  20 मजली असून इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आग लागली.  आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीच्या घटनेनंतर जखमींना दवाखान्यात दाखल करायला घेऊन गेल्यानंतर हॉस्पिटल्सने नकार दिला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. काही लोकांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आलं, त्या वेळेला रुग्णालयांनी पैशांअभावी आणि कोविड टेस्ट अभावी त्यांना अॅडमिट करण्यास नकार दिल्याचं सचिनम हाईट्समधील रहिवाशांकडून सांगण्यात आलं.  मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट, रिलायन्स आणि भायखळा येथील मसिना हॉस्पिटल यांनी या रुग्णांना दाखल करुन घेण्यास नकार दिल्याचं स्थानिकांनी सांगितलं. या नंतर जखमींना नायर या ठिकाणी अॅडमिट करण्यात आलं. 

Continues below advertisement


जबाबदार लोकांवर कारवाई करावी- फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, मुंबईतील आग दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबियांबद्दल मी सहानुभुती व्यक्त करतो.  पण दुर्घटनेत जखमी झालेल्यांना स्थानिक हॅास्पिटल्सने दाखल करून द्यायला नकार दिल्याची माहिती आहे.  याच कारणामुळे मृतांचा आकडा वाढला असल्याची माहिती आहे.  जर हे खरं असेल तर महापालिका आणि राज्य प्रशासनानं तात्काळ याची दखल घेत कारवाई करावी.  सबंधित जे जे कोणी याला जबाबदार आहेत त्या सर्वांवर कडक कारवाई व्हावी, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. 


महापौर किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या... 
महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आम्ही रिलायन्स ,मसीना ,वोक्हार्ट या रुग्णालयांना या आगीत जखमी झालेल्यांना उपचारासाठी दाखल न करून घेण्याबाबत जाब विचारणार आहोत.  त्यांचे नेमके उत्तर काय मिळतं हे बघणार आहोत.  सकाळी आगीत जखमींना या तीन रुग्णालयांनी  त्वरित उपचारासाठी दाखल करून घेतलं नाही, असं त्या म्हणाल्या.


आगीत सहा जणांचा मृत्यू


या आगीत मितेश मिस्त्री, मंजूबेन कंठारिया, पुरूषोत्तम चोपडेकर यांच्यासह इतर तिघांचा मृत्यू झाला तर हंसा चोक्सी, फालगुणी चोक्सी, धावेल, यश चोक्सी, शुभांगी साळकर, दिलीप साळकर, ममता साळकर, तनिषा सावंत, अंकिता चौधरी, धनपत पंडित, गोपाळ चोपडेकर, स्नेहा चोपडेकर, वेदांगी चोपडेकर, मीना चव्हान, प्रतिमा नाईक, कल्पना नाडकर्णी, स्मीता  नाडकर्णी, रुदया चोपडेकर, मनिश सिंग, मंजू खान्ना अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. 






महत्वाच्या बातम्या