मुंबई : रांगेने बांधलेले हौद, मोठ्या दगडावर आपटून कपडे धुणारे धोबी, त्यातून पाण्याचे उडणारे तुषार आणि लांबच लांब रश्श्यांवर धुऊन वाळत घालत घातलेले कपडे... मुंबईतल्या हेरिटेज समजल्या जाणाऱ्या धोबीघाटाचं हे चित्र लवकरच पालटणार आहे. धोबीघाट परिसराचा विकास होणार असून तिथल्या झोपड्यांचं पुनर्वसन केलं जाणार आहे.

'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपटामध्ये ज्या घाटावर संजय दत्तला बापू दिसले, 'शूटआऊट अॅट वडाळा'त ज्या घाटावर अनिल कपूरनं व्हिलनला चोपलं, तोच घाट आता अखेरच्या घटका मोजणार की काय अशी शंका निर्माण झाली आहे. कारण एका बड्या रिअल इस्टेट कंपनीनं या हेरिटेज धोबीघाटाच्या आसपासची जमीन विकसित करण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईतल्या प्रसिद्ध ओंकार बिल्डरनं ही जागा सुमारे वर्षभरापूर्वी विकत घेतली. त्यासाठी 90 टक्के स्थानिकांनी विकासकामांसाठी परवानगी दिल्याचा दावा कंपनीनं केला आहे. या जागेवर एक रहिवासी संकुल आणि कमर्शिअल कॉम्प्लेक्स उभारण्याचा कंपनीचा प्लॅन आहे. मात्र उर्वरित 10 टक्के लोकांनी कंपनीविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

धोबी घाटातून उडणारं पाणी आणि एका रांगेत... एकाच रंगाचे वाळत घातलेले कपडे... हे धोबी घाटाची वैशिष्ट्य... पण या बांधकामामुळे वाळत घालण्याची धोब्यांची जागा जाणार आहे. आम्ही हेरिटेज अशा धोबीघाटाला धक्का लावणार नाही, ते स्ट्रक्चर कायम राहील. आम्ही त्या बाजूची जागा घेतली आहे, असा दावा ओंकार बिल्डर्सचे संचालक कौशल मोरे यांनी केला आहे. शिवाय ड्रायर देणार असल्याचंही मोरे म्हणाले.

मात्र आम्हीला ड्रायर नको, त्याचं वीज बिल कोण भरणार असं धोब्यांचं म्हणणं आहे. उन्हात वाळतात तसे ते ड्रायरमध्ये वाळत नाहीत, असंही धोबी सांगतात. अख्ख्या मुंबईला धुवून काढणारा हा धोबी घाट...  1890 ते 1895 दरम्यान याची सुरुवात झाली. धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास सहकारी सोसायटीने हा धोबी घाट सुरु केला. या धोबी घाटावर 731 ओटे आहेत

इथे एका दिवसात तब्बल 5000 धोबी काम करू शकतात. या धोबी घाटावर तब्बल 200 कुटुंबं प्रत्यक्षपणे अवलंबून आहेत. या धोबी घाटावरून दिवसाला तब्बल 1 लाख कपडे धुतले जातात. एका दोरीवर तब्बल दीडशे कपडे वाळत घातले जातात. विविध हॉटेल्स, दवाखाने आणि कारखान्यांचे कपडे इथेच धुतले जातात.

सुरुवातीला उत्तर भारतीयांचे प्राबल्य असलेल्या या घाटावर आता सर्वप्रांतीयांचा हक्क आहे. मुंबई 10 मिनिटात दाखवायची असले, तर त्यातली दोन मिनिटे ही धोबी घाटावर जातील. त्यामुळे मुंबईला धुवून काढणारा हा घाट काळाच्या ओघात धुतला जाऊ नये, याची काळजी घ्यावी लागेल.