Mumbai: मुंबई पोलिसांच्या प्रतिमेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अँटिलियाची घटना किंवा मनसुख खून प्रकरणानंतर असे प्रकार घडू नयेत यासाठी मुंबई पोलिस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Mumbai Police Commissioner Hemant Nagrale) यांनी ठोस पाऊल उचलले. पोलीस अधिकारी कर्तव्याच्या नावाखाली पैसे उकळत असल्याचे लक्षात येताच त्यांनी चौकशी सुरू केली. याप्रकरणात दोषी आढळलेल्या आधिकाऱ्यांवर वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.


तीन पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध वसुलीचा गुन्हा दाखल
पोलीस निरीक्षक ओम वनघाटे,सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम आणि पोलीस उपनिरीक्षक समाधान जामठाडे या तीन पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. हे तीन अधिकारी सध्या एलटी मार्ग (LT Road) पोलीस ठाण्यात कार्यरत होते, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. 


व्यापाऱ्यांची पोलीस आयुक्तांकडं तक्रार
आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत हे तिन्ही अधिकारी लहान-मोठ्या व्यापाऱ्यांकडून पैसे उकळायचे. दरम्यान, या वसुलीमुळं काही व्यापाऱ्यांनी नाराज होऊन जानेवारी महिन्यात पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार केली होती. व्यापाऱ्यांनी केलेल्या तक्रारीत संबंधित झोनचे डीसीपी सौरभ त्रिपाठी यांचंही नाव होतं. यानंतर आयुक्त नगराळे यांनी अतिरिक्त आयुक्त दक्षिण विभागीय आयुक्त दिलीप सावंत यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितलं. 


दिलीप सावंतांकडून याप्रकरणी चौकशी
दिलीप सावंत यांनी याप्रकरणी चौकशी केली असता तीन पोलीस अधिकारी वसुलीसाठी सक्रिय असल्याचं त्यांच्या तपासात निष्पन्न झालं. त्यानंतर तिघांविरुद्ध एलटी मार्ग (LT Road) पोलीस ठाण्यात वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.या तिन्ही पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध (IPC Act) कलम 384 आणि 392 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात डीसीपी सौरभ त्रिपाठी यांच्यावरही वसुलीचा आरोप होता. मात्र, तपासात त्यांच्याविरुद्ध काहीही निष्पन्न झाले नाही.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha