मुंबई: दादर पश्चिमेतील प्रसिद्ध कबुतरखाना हटविण्याच्या हालचाली अखेर मुंबई महापालिका स्तरावर सुरू झाल्या आहेत. कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या आरोग्यधोक्याच्या तक्रारींमुळे हा कबुतरखाना (KabutarKhana) वरळी अथवा प्रभादेवी येथे स्थलांतरित करण्याचा विचार महापालिकेने सुरू केला आहे. यामुळे आता शहरातील इतर कबुतरखाने देखील हटवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होऊ लागली आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून दादर येथे हा कबुतरखाना असून, येथे कबुतरांची संख्या बेसुमार वाढली आहे. याचा थेट परिणाम स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावर होत आहे. घरांच्या खिडक्या, गॅलऱ्यांमध्ये कबुतरांचा वावर वाढला असून, विष्ठेमुळे परिसर अस्वच्छ होत आहे. कपडे सुकविण्यासाठी लावलेल्या दोऱ्यांवरही कबुतरांचा कब्जा असून, नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आंदोलन केले होते. त्यानंतर महापालिकेने या प्रश्नाची दखल घेत पुढील कार्यवाहीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.


यासंदर्भात महापालिकेच्या हेरिटेज विभाग, आरोग्य विभाग आणि परिरक्षण विभागाची 25 मार्चला बैठक होणार होती. मात्र, ती पुढे ढकलण्यात आली आहे. तरीही हा कबुतरखाना प्रभादेवीतील कीर्ती महाविद्यालय परिसर किंवा वरळीतील मोकळ्या जागेत हलविण्याचा विचार महापालिका करत आहे. लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.


मनसेकडून कबुतरखाना बंद करण्याची मागणी


ग्रेड 2 ची हेरिटेज वास्तू असलेला दादरचा कबुतरखाना 1933 मध्ये पाण्याचा कारंजा म्हणून बांधण्यात आला होता. मात्र, अनेक रहिवाशांनी नंतर तिथे कबुतरांना दाणे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे या जागेला कबुतरखान्याचे स्वरुप झाले. गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक रहिवाशांना श्वसनाचा त्रास होत असल्याचं सांगत राज ठाकरे यांच्या मनसेने हा कबुतरखाना म्हणजे कबुतरांचं अनधिकृत खाद्यकेंद्र बंद करण्याची मागणी केली केली होती. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मनसेकडून या मागणीचा पाठपुरावा केला जात आहे. कबुतरांमुळे दादरमधील अनेक रहिवासी, विशेषतः लहान मुलं आणि वयोवृद्ध नागरिकांना श्वसनाचे विकार जडले आहेत. पक्ष्यांची विष्ठा आणि पिसांमुळे अनेक इमारतींच्या खिडक्या खराब होतात, असे मनसेने पालिकेला पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. मनसेने 2017 साली ही मागणी केली होती. त्यावेळी भाजपने त्याला विरोध केला होता. कबुतरखाना हा मुंबई शहराच्या इतिहास आणि वारशाचा भाग आहे. काही समाज कबुतरांना दाणे देत असल्याने धार्मिक भावनाही या वास्तूशी निगडीत आहेत, असा दावा भाजपने केला होता.



आणखी वाचा


कबुतराचं घरात घरटं बांधणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रानुसार मिळतो 'हा' मोठ्ठा संकेत, जाणून घ्या