मुंबई : दादरमधील 46 मजल्यांच्या आर. ए. रेसिडेंसीमधील 42 व्या मजल्यावरील प्लॅटमधील आग अग्निशमन दलाच्या जवानांनी विझवली. परंतु ऐनवेळी लिफ्ट बंद पडलल्याने जवानांना तब्बल 42 मजले चढून या आगीवर नियंत्रण मिळवावे लागले. या घटनेनंतर अग्निशम दलाच्या जवानांच्या समयसूचकतेचे सर्वच स्तरातून  कौतुक होत आहे. परंतु मुंबईतील उंच इमारतीत अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय.  


दादरमधील 46 मजली इमारतीमधील 42 व्या मजल्यावरील फ्लॅटला गुरुवारी रात्री आग लागली होती. परंतु ऐनवेळी इमारतीचे लिफ्ट बंद पडले आणि फायर फायटिंग सिस्टिम देखील बंद झाली. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी या यमारतीचे 42 मजले चढून तेथील आग विझवली. अग्निशमन दलाच्या जवानांच्या या समयसूचकतेचं आता सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. परंतु, या घटनेमुळे मुंबईतील उंच इमारतीतील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. उंच इमारतीतील अग्निसुरक्षेकडं बील्डर आणि सोसायटीचं दुर्लक्ष होतंय का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याबाबत मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी संजय मांजरेकर यांनी एबीपी माझासोबत संवाद साधून माहिती दिलीय. 


"दादरमधील 46 मजल्यांच्या इमारतीमघील 42 व्या मजल्यावर काल आग लागली. आगीची माहिती मिळाल्यानंतर आमचे जवान तात्काळ घनास्थळी पोहोचले. ज्या फ्लॅटला आग लागली होती त्या फ्लॅटमध्ये नुतनीकरण केलं होतं. त्यामुळे ही आग खूप कमी वेळेत संपूर्ण घरात पसरली. शिवाय आग लागलेला फ्लॅट हा जवळपास साडेतीन हजार स्क्वेअर फुटांचा होता. संपूर्ण फ्लॅटमध्ये आग पसरली होती. त्यामुळे स्थानिकांनी प्रथम आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे लिफ्टमध्ये पाणी गेले आणि लिफ्ट बंद पडली. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना 42 मजले चढून आग लागलेल्या ठिकाणी पोहचावं लागलं. परंतु, जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं. जवानांना यावेळी शंभर किलो वजनाचे चार एलपीपी दहावा, वीसावा आणि तिसाव्या मजल्यावर नेले. तेथून पाईप लावून फ्लॅटमधील आगीवर नियंत्रण मिळवलं, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी संजय मांजरेकर यांनी दिली.    


ज्या फ्लॅटमध्ये आग लागील होती त्या फ्लॅटमध्ये देखील आग विझवण्याची यंत्रणा होती. शिवाय इमारतीत देखील ही यंत्रणा होती. परंतु, त्यामध्ये पाणी गेल्यामुळे ही यंत्रणा बंद पडली आणि जवानांना 42 मजले चढून आग विझवावी लागली अशी माहिती संजय मांजरेकर यांनी यावेळी दिली. 


अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत


दादरमधील घटनेनं पुन्हा एकदा उंच इमारतीत अग्निसुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. या दुर्घटनेस जबाबदार कोण? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण मुंबईत आग लागण्याच्या घटना सतत घडत आहेत. गेल्या काही दिवसापूर्वीच लालबागमधील (Lalbagh News) टोलेजंग इमारत वन अविघ्न पार्कला (One Avighna Park) आग लागली होती. त्या ठिकाणी देखील अग्निशामक दलाची यंत्रणा बंद होती. त्यामुळं आग अटोक्यात आणण्यात उशीर लागला. अग्निशामक दलाला फायर वनचा कॉल देण्यात आला होता. त्यानंतर अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलं होतं. वन अविघ्न ही मुंबईतील लालबाग परिसारातील 60 मजल्यांची इमारत आहे. अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे नागरिकांमधून याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या : 


Dadar Fire : दादरमध्ये रहिवासी इमारतीला आग, चार तासाच्या प्रयत्नानंतर आग अटोक्यात; लिफ्ट बंद असल्यामुळं अडथळा