मुंबई : घड्याळाच्या काट्यांशी शर्यत करून लाखो मुंबईकरांना वेळेवर जेवण पोहोचवणारे मुंबईचे डबेवाले (Mumbai Dabbawala) सहा दिवसांच्या रजेवर जाणार आहे. येत्या 3 ते 8 एप्रिल या कालावधीत डबेवाल्यांची सेवा बंद असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या अडचणीत भर पडणार आहे. 


मुंबईचे डबेवाले बांधव आपापल्या गावांमधल्या वार्षिक यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत. अत्यंत प्रामाणिक व धार्मिक वृत्तीची माणसं म्हणून डबेवाल्यांची ओळख आहे. मुंबईतल्या विविध कार्यालयांमध्ये घरच्या जेवणाचे डबे पोहोचणारी मंडळी ही मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, अकोला आणि संगमनेरमधल्या गावांमधून येतात. त्या गावांमधल्या कुलदैवतांच्या यात्रा सुरू झाल्या आहेत. त्या यात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईतील डबेवाले आपापल्या गावी जाणार आहेत. त्यामुळं येत्या  3ते 8  एप्रिल या कालावधीत डबेवाल्यांनी आपली सेवा बंद ठेवली आहे.


मुंबई डबेवाला असोसिएशनने व्यक्त केली दिलगिरी 


मुंबईतल्या नोकरदारांचं दुपारचं जेवण हे मोठ्या प्रमाणात डबेवाल्यांवर अवलंबून आहे. मुंबईतल्या कार्यालयांमध्ये जेवण पोहचवण्याचं काम हे डबेवाले  करत असतात. मुंबईतल्या नोकरदारांची या सहा दिवसांच्या कालावधीत गैरसोय होणार आहे. मात्र याबाबत मुंबई डबेवाला असोसिएशन दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच या कालावधीत पैसे न कापण्याची विनंती देखील केली आहे.


सलग येणाऱ्या सुट्ट्या


उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये नोकरदारांना डबा पोहोचवण्याचं काम डबेवाले अविरतपणे करत आहे. शाळा, महाविद्यालयांना देखील आता सुट्ट्या सुरू होणार आहेत. घरचे ताज जेवणे दुपारी मुंबईकरांना पोहचविणारे मुंबईचे डबेवाले ( Mumbai Dabbawala ) 3 ते 8  एप्रिल असे सलग पाच दिवस सुटीवर गेले आहेत.  शासकीय सुट्या व गावची जत्रा याचा योग ते साधणार आहेत. 3 आणि 4 एप्रिलला महावीर जयंती आहे. तसेच 6 एप्रिलला हनुमान जयंती आणि 7 एप्रिलला गुड फ्रायडे अशा सलग येणाऱ्या सुट्यांचा योग डबेवाले साधणार आहेत.


डबेवाल्यांच्या व्यवस्थापनाचे जगभर कौतुक


मुंबई डबेवाल्यांचा 130 वर्षाचा गौरवशाली इतिहास आहे. लोकल ही जशी मुंबईची लाइफलाइन आहे, तशीच ती डबेवाला लाइफलाइन आहे.  सकाळी 9 ते सायंकाळी 5  या वेळेत लोकलची गर्दी,  मुंबईचं ट्रॅफिक अशा साऱ्याच समस्यांतून ग्राहकांपर्यंत डबे पोहोचवण्याचे कठीण काम करणाऱ्या डबेवाल्यांच्या व्यवस्थापनाचे जगभर कौतुक झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही सेवा बिनबोभाटपणे सुरू आहे.  'ग्राहक हाच आमचा राजा आहे’ अशा वृत्तीने सेवा देण्याचे कार्य सुरू असते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


डबेवाला भवनच्या उद्घाटनावेळी महापौर गहिवरल्या तर आदित्य ठाकरे म्हणाले, लाईफलाईन जगवायला हव्यात