मुंबई : मोबाईल चोराशी झटापट करताना लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू झालाय. कळवा रेल्वे स्थानकात लोकल खाली आल्यामुळे या महिलेला जीव गमवावा लागला आहे. विद्या पाटील असं या महिलेचं नाव आहे. त्या शनिवारी संध्याकाळी लोकलनं प्रवास करत होत्या. त्याचवेळी लोकलच्या महिला डब्ब्यातून केवळ पाच महिला प्रवास करत होत्या. कळवा रेल्वे स्थानकातून लोकल मार्गस्थ होत असतानाच एका चोरट्यानं लोकलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यानं विद्या यांच्या हातातून मोबाईल घेत पळ काढला. तेवढ्यात चोरट्याला प्रतिकार करण्याच्या प्रयत्नात त्या लोकलमधून खाली उतरल्या, मात्र तोवर प्लॅटफॉर्म संपला आणि रेल्वेखाली आल्यानं त्यांचा मृत्यू झाला.
विद्या पाटील यांच्या पश्चात पती आणि तीन लहान मुली असा परिवार आहे. चोराने विद्या पाटील यांच्या हातातील मोबाईल खेचला. विद्या यांनी त्याला प्रतिकारही केला. या झटापटीमध्ये चोरट्याने त्यांना धक्का दिला. या झटापटील त्यांचा तोल गेला. त्या प्लॅटफॉर्मवर उतरल्याही पण तेवढ्यात प्लॅटफॉर्म संपला आणि चोरासोबतच्या झटापटीत विद्या पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या जाण्यानं त्यांच्या मुलींच्या डोक्यावरील मायेचं छत्र हरपलं आहे. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.
लॉकडाऊन असताना चोरटा लोकलमध्ये आलाच कसा?
पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला मुंब्रा येथून अटक केली आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशातच मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणाऱ्या मुंबई लोकलमधून सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी खुली नसतानाही चोरटा लोकलमध्ये आलाच कसा असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :