Mumbai Crime News Update : जर तुम्ही घरात मोलकरीण ठेवत असाल तर सावधान! कारण मोलकरीन तुमच्या आयुष्याच्या पुंजीवर डल्ला मारू शकते. असाच एक प्रकार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंधेरी पूर्वेकडील पूनम नगर परिसरात घडला आहे. धीरज वैभव या इमारतीत राहणाऱ्या फिर्यादी यांच्या घरात दोनच दिवसापूर्वी कामाला ठेवलेल्या मोलकरीणमुळे डल्ला मारला आहे. दोनच दिवसांपूर्वी कामाला ठेवलेल्या मोलकरणीनेच घरातील आयुष्यभराच्या पुंजीवर डल्ला मारला आहे. यामुळे मोठं नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूनम नगर महाकाली केज रोड परिसरातील धीरज वैभव इमारतीत एका जोडप्याच्या घरात काम करण्यासाठी नव्याने मोलकरीण ठेवण्यात आली होती. मात्र याच मोलकरनीने कपाट तोडून तब्बल तीनशे तीन ग्राम वजनाचे सोने, ज्याची अंदाजे किंमत सोळा लाख 51 हजार पाचशे रुपये आणि रोख रक्कम पंधरा हजार रुपये घेऊन फरार झाली होती. याविषयीची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये फिर्यादी यांनी स्वतः दिल्यानंतर पोलिसांनी कलम 381 भादवी नुसार गुन्हा दाखल करून घेतला होता. त्यानंतर तपास सुरु केला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलिसांनी तपासासाठी एक पद्धत तयार करून तात्काळ घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवली. गुन्हा घडल्यानंतर आरोपी महिलेने जी रिक्षा पकडली होती, त्या रिक्षाचा ठाव ठिकाणा शोधत आरोपी महिला शिवडी परिसरात असल्याचे समजतात तपास पथकाने महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर महिलेला अटक करून तिच्याकडून चोरी केलेला संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. सध्या महिला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत. यामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस घेत आहेत.
अशीच घटना मुंबई पोलिसांच्या परिमंडळ 10 मध्ये काही दिवसापूर्वी घडली होती. जोगेश्ववरीच्या मेघवाडी परिसरात घरातील नोकरानेच मालक व मालकाच्या पत्नीवर चाकू हल्ला केला होता. चोरीच्या उद्देशाने हा हल्ला केल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. या हल्यात मालकाचा मृत्यू झाला होता. सुधीर चिपळूणकर असे या वयोवृद्ध व्यक्तीचे नाव होते. तर या हल्यात सुप्रिया चिपळुणकर या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यामुळे मुंबई पोलिसांनी आवाहन केले आहे, जर तुम्ही घरात नोकर ठेवत असाल तर त्या व्यक्तीची सखोल माहिती घ्या. त्या व्यक्तीचे पोलीस वेरिफिकेशन करा, त्यानंतरच कामाला ठेवा. अन्यथा तुम्ही कमवलेल्या पैशावर डल्ला मारला जाऊ शकतो, तुमच्या घरात चोरी होण्याची शक्यता आहे.