मुंबई : मुंबईत अजब प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने नवीन घर खरेदी केलं. पण त्यासाठी आवश्यक रक्कम त्याला जमा करता आली. कोणताही मार्ग न सुचल्याने त्याने शक्कल लढवली. त्याने आपल्या मित्रासह 35 रुपये चोरी झाल्याचा बनाव रचला. 32 वर्षीय आरोपीने मध्य मुंबईतील माटुंग्यात (Matunga) ही चोरी झाल्याचं सांगितलं. परंतु पोलिसांनी दोन तासात या प्रकरणाचा उलगडा केला आणि बनाव रचणाऱ्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.
तक्रार करण्यासाठी स्वत:च पोलीस स्टेशनमध्ये
अंधेरी पूर्व इथे वास्तव्यास असलेला अजित पटेल हा बुधवारी माटुंगा पोलीस स्टेशनमध्ये आला. नप्पू रोडवरील पेट्रोल पंपाजवळ दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी 35 लाख रुपये ठेवलेली बॅग पळवल्याचं त्याने सांगितलं. अजित तक्रार घेऊन येताच माटुंगा पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. घटनेबाबत आणखी माहिती मिळवण्यासाठी अजित पटेल आणि त्याच्यासोबत आलेल्या एका व्यक्तीची विचारपूस केली.
चोरी झालीच नसल्याचं समोर
पोलिसांनी दोघांची वेगवेगळी चौकशी केली. तपासात समोर आलं की चोरीच्या ज्या घटनेबाबत ते बोलत आहेत, त्यात बऱ्याच विसंगती आहेत. अजित पटेल याने सांगितलेल्या घटनास्थळी पोहोचले. आजूबाजूच्या सीसीटीव्हीची तपासणी केली. परंतु या ठिकाणी अशी कोणतीही लूट झाली नसल्याचं त्यात दिसलं. यामुळे संशय आल्याने पोलिसांनी अजित पटेल याच्या मोबाईल फोनच तपास केला. तांत्रिक विश्लेषणात हा संशय अधिक बळावला.
फ्लॅटचे पैसे देण्यासाठी वेळ मिळावा यासाठी बनाव
आपण दाखल केलेल्या चोरीच्या तक्रारीत पोलिसांना कोणतंही तथ्य आढळलं नसल्याचं जेव्हा अजित पटेलला समजलं, त्यानंतर त्याने कबुली दिली. त्याच्यासोबत आलेला दुसरा व्यक्ती चालक असल्याचं समोर आलं. पटेलने पोलिसांना सांगितलं की, मी एक फ्लॅट खरेदी केला होता, दोघांमध्ये व्यवहार झाला होता. रक्कम न दिल्यास हा सौदा फिस्कटणार होता. पण त्यासाठी 35 लाख रुपये जमा करण्यात त्याला अपयश आलं. यानंतर त्याच्या डोक्यात चोरीचा बनाव रचण्याची कल्पना आली आणि त्याने तो अंमलात आणला. त्याने चोरीची कहाणी तयार केली, जेणेकरुन ही रक्कम फेडण्यासाठी आणखी थोडा वेळ मिळेल. परंतु पोलिसांनी ही बाब लक्षात आली आणि त्याचा डाव फसला.
पोलिसांनी खोटी तक्रार दिल्याप्रकरणी तक्रारदार आणि चालकाविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
हेही वाचा
Mumbai News : मुंबईत 15 दिवसात दोन आरोपींची लॉकअपमध्ये आत्महत्या, पोलिसांच्या लॉकअप सुरक्षेवर प्रश्न