मुंबई : मुंबईत एअर होस्टेसची (Air Hostess) हत्या करणाऱ्या आरोपीने लॉकअपमध्येच (Lockup) आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. अंधेरी पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्येच आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. विक्रम अटवाल असं आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पोलीस लॉकअपमध्ये आत्महत्या होण्याची ही गेल्या 15 दिवसातील दुसरी घटना आहे. यापूर्वी बोरीवली लॉकअपमध्ये देखील एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यामुळे मुंबई पोलिसांच्या लॉकअपमधील आरोपींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.


पवई परिसरातील एन जी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत रविवारी (4 सप्टेंबर) रुपल ओग्रे नावाच्या एअर होस्टेसची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती.या हत्येप्रकरणी पवई पोलिसांनी विक्रमला अटक केली होती. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपी विक्रम अटवाल याला 8 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र सकाळी सहाच्या सुमारास आरोपीने पँटने गळफास घेत आत्महत्या केली. 


नातेवाईकांनी रुपल ओग्रेच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद येऊ लागल्यामुळे नातेवाईकांनी तिच्याजवळच्या काही मित्रांना संपर्क करुन माहिती दिली. रुपलच्या मित्रापैकी एक मित्र तिच्या घरी गेला असता तिच्या फ्लॅटला कुलूप दिसले. त्याने सोसायटीला याबाबत माहिती दिली, त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता रुपल त्यांना मृतावस्थेत आढळून आली. रुपलचा गळा चिरुन तिचा खून करण्यात आला होता.


न्यायालयात हजर करण्यापूर्वीच आयुष्य संपवलं


इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज, सोसायटीत काम करणारे इतर कर्मचारी, वैद्यकीय तपासणी आणि तांत्रिक मदत या सर्व बाबींची तपासणी करुन पोलिसांनी विक्रमला अटक केली होती. आज त्याची पोलीस कोठडी संपणार होती आणि त्याला पुन्हा रिमांडसाठी न्यायालयात हजार केले जाणार होते मात्र तत्पूर्वीच पोलीस कोठडीतच पँटने गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.


बोरिवलीत लॉकअपमध्ये आरोपीचा गळफास


दरम्यान, बोरिवली पोलीस ठाण्याच्या हद्दी अंतर्गत असलेल्या लॉकअपमध्ये देखील 27 जुलैच्या पहाटे दीपक जाधव (वय 28 वर्ष) या आरोपीने  गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आरोपींसाठी लॉकअप सुरक्षित मानले जात असताना मागील एक दीड महिन्याच्या कालावधीत दोन आरोपींनी केलेल्या आत्महत्येमुळे लॉकअपमधील सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण झाला आहे.


हेही वाचा


Mumbai Crime : मुंबईत एअर होस्टेसची हत्या करणाऱ्या आरोपीची आत्महत्या, लॉकअपमध्ये पँटने गळफास घेतला