मुंबई : मुंबईतील वीरा देसाई रोड परिसरात चोरांचा अक्षरश: सुळसुळाट पहायला मिळतोय. मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी घरात घुसून चोरी करण्याच्या घटनांमध्ये (Mumbai Crime News) वाढ झाली आहे. मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वीरा देसाई रोड कंट्री क्लब जवळील एका घरात चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे उघडकीस आली आहे.
शनिवारी रात्रीच्या सुमारास काही चोर ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वीरा देसाई रोड कंट्री क्लबच्या जवळील एका घरात चोरट्यांनी डल्ला मारला. प्रजापती कंपाउंड परिसरातील एका घरात चोरीच्या उद्देशाने हे चोरटे घुसले. मात्र घरात चोराला काही मिळाले नाही, मग बाहेर पडताना दरवाजात उभ्या असलेल्या दुचाकीवरील हेल्मेट या चोरट्यांनी पळवलं. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालंय.याप्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत आहेत. मात्र या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी अशा चोरांचा बंदोबस्त त्वरीत करणे गरजेचे असल्याचे मत रहिवाशांनी व्यक्त केले आहे.
दिवाळीत घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ
दिवाळीच्या सणात शहरातील बरेच कुटुंब बाहेरगावी जातात. अशावेळी घरफोडी करून रोख रक्कम व दागिने चोरीस जाण्याचे प्रकार नेहमीचे झाले आहेत. फक्त मुंबईत नाही तर राज्यात अनेक ठिकाणी दिवाळीत घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसते. म्हणून घर सोडून जाऊच नये का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती मिळावी यासाठी नागरिक घरासमोर सीसीटीव्ही लावत आहेत.त्यामुळे पोलिसांना तपासाला मदत मिळत आहे.
भिवंडीत घरफोडी करणाऱ्या दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या
भिवंडी शहरातील गायत्री नगर परिसरात दिवाळीच्या सुट्टीत बाहेर गेलेल्या एका कुटुंबाच्या बंद घराचे टाळे तोडून घरात प्रवेश करून घराच्या कपाटातून सोन्या चांदीचे दागिने त्याचप्रमाणे रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. या घटनेची माहिती कुटुंबाला मिळाली आणि तात्काळ त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. घरात चोरी झाल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली तेव्हा या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन घेतला. त्याप्रमाणे पोलिसांनी चोरट्यांचा शोध देखील सुरु केला. त्यानंतर अवघ्या सहा तासांमध्येच हा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला. तसेच या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली. या दोन्ही आरोपींकडून चोरी केलेले 1 लाख 27 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तर 34 हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा एकूण 1 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात शांतीनगर पोलिसांना यश आले आहे.
हे ही वाचा :