ICC Cricket World Cup Final :  क्रिकेट वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. भारतीय क्रिकेट चाहते नाराज आहेत. दादरमध्ये छत्रपती शिवाजी पार्कच्या मैदानाता काही जणांमध्ये जुंपली. मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत असलेल्या तीन-चार जणांमध्ये हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


दादरमधील छत्रपती शिवाजी पार्क मैदानाता मोठी स्क्रीन लावून वर्ल्ड कप फायनल मॅचचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. या मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या मध्ये विविध वयोगटातील लोकांचा समावेश होता. असाच सामना पाहण्यासाठी आलेल्या तीन ते चार जणांमध्ये सामना संपल्यानंतर वाद झाला. या तीन-चार जणांमध्ये जोरदार हाणामारी झाली. अखेर तिथे उपस्थित असलेल्या तिघांनी हस्तक्षेप करत हाणामारी करणाऱ्यांना दूर लोटले. 


हेड डोकेदुखी ठरला, ऑस्ट्रेलियाने चषकावर कोरले नाव, भारताचं स्वप्न भंगलं



नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा विकेटने पराभव करत सहाव्यांदा चषकावर नाव कोरले. ट्रेविस हेडचं झंझावती शतक आणि लाबुशनेचं संयमी अर्धशतकामुळे भारताच्या विश्वचषक विजयाचे स्वप्न भंगले. भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियानं याआधी 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्ये विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. ऑस्ट्रेलिया विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ आहे. 


भारताने दिलेल्या 241 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने वादळी सुरुवात केली. डेविड वॉर्नर आणि ट्रेविस हेड यांनी पहिल्याच षटकात 15 धावा वसूल करत इरादे स्पष्ट केले होते. पण मोहम्मद शामीने दुसऱ्याच षटकात डेविड वॉर्नरचा अडथळा दूर केला. डेविड वॉर्नर बाद झाल्यानंतर मिचेल मार्शही फार काळ तग धरु शकला नाही. जसप्रीत बुमराहने मिचेल मार्श याचा अडथळा दूर केला. मिचेल मार्शने 15 चेंडूत 15 धावा केल्या. त्याने या छोटेखानी खेळीत एक चौकार आणि एक षटाकर ठोकला. स्टिव्ह स्मिथ याला लौकिकास साजेशी खेली करता आली नाही. स्मिथ फक्त चार धावांवर बाद झाला. स्मिथचा अडथळा बुमराहने दूर केला. पण त्यानंतर ट्रेविस हेड आणि मार्नस लाबुशेन यांनी 192 धावांची भागिदारी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.