मुंबई : सर्व बँक खातेधारकांना सावध करणारी बातमी आहे. तुमचं बँक खातं तुमच्या मोबाईल नंबरशी अटॅच केलेलं असेल आणि मुलं मोबाईल फोनवर गेम खेळत असतील तर तुमच्या खात्यातील पैसे गेलेच समजा. कारण मुंबईतल्या भाजी विक्रेत्यासोबत असा प्रकार घडला आहे. त्याच्या बँक खात्यातून तब्बल साडेतीन लाख रुपये कट झाले आहेत.


या डिजिटल युगात बहुतांश ग्राहकांनी आपले बँक खाते मोबाईल क्रमांकाशी जोडले आहे. यामुळे बँकेत जाऊन रांगेत तासनतास तास उभं राहावं लागत नाही. अंधेरीतील एक भाजी विक्रते दिवसभर भाजी विकून आपल्या परिवाराचं पोट भरतात. गेल्या आठ महिन्यापासून मात्र त्यांच्या बँक खात्यातून कधी चार हजार तर कधी सहा हजार रुपये कटत आहेत. त्यामुळे त्यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेकडे तक्रार केली.


पोलिसांनी तपास केला असता ते पैसे मोबाईलच्या आयपी अॅड्रेसमधून कट झाल्याचं समोर आलं. पुढे तपास केला असता त्यांचा मुलगा मोबाईल फोनवर गेम खेळत होता. या गेमचं नाव आहे फ्री फायर गेम आणि त्या माध्यमातून 3 लाख 40 हजार रुपये त्यांच्या अकाऊंटमधून कट झाल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली. त्यामुळे जनतेने पालकांनी सावध राहावे असे आवाहन सायबर सेलच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी सविता शिंदे केलं.


त्यामुळे जर तुम्ही सुद्धा आपला मोबाईल फोन लहान मुलांच्या हातात देत असाल तर नक्कीच मुलांवर लक्ष ठेवून राहा की मुलं नेमकी मोबाईलमध्ये काय करतो. पालकांच्या सतर्कतेमुळे अशा घटना कमी होऊ शकतात, असं आव्हान मुंबई सायबर गुन्हे शाखेकडून करण्यात आला आहे.