कल्याण : कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उंबर्डे गावात 22 फेब्रुवारी रोजी झालेल्या 35 वर्षीय महिलेच्या हत्येप्रकरणी नवीन उलगडा झाला आहे. ही हत्या अनैतिक संबध आणि लुटीच्या उद्देशाने झाल्याचे निष्पन्न झालं आहे. या आरोपीने सुरुवातीला तपासादरम्यान वारंवार पोलिसांची दिशाभूल केली. मात्र पोलिसांनी शिताफीने तपास करत या हत्येचा गुंता सोडवला. या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी साशा या पोलिसांच्या श्वानाची देखील मदत झाली. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी पवन घोडे याच्यासह त्याला गावठी पिस्तुल पुरवणाऱ्या जयेश जाधव आणि अजय पवार यांना देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.


कल्याणजवळील सापर्डे गावात 22 फेब्रुवारी रोजी एका 35 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली. तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली होती. आरोपी पवन म्हात्रे याने सुवर्णा गोडे या महिलेचा खून केला होता. पोलिसांनी याप्रकरणी त्याला ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी आरोपीने संबंधित महिलेचे अनैतिक संबंध होते. त्यातूनच हा प्रकार घडला. या झटापटीत त्याची आई जखमी झाली, असं आरोपीने पोलिसांना सांगितलं होतं. मात्र, आता खडकपाडा पोलिसांच्या तपासात या घटनेला वेगळं वळण मिळाले आहे.


पोलीस तपासादरम्यान आरोपी पवनने लुटीच्या इराद्याने सुवर्णा गोडेला हळदी कार्यक्रमाच्या रात्री काही बहाण्याने घरात नेले. त्याच्याकडील गावठी कट्ट्याच्या पिस्टलने सुवर्णा गोडे महिलेच्या डोक्यात गोळ्या घातल्यानंतर तिच्या गळ्यातील 6 लाख 80 हजार रुपये किमतीचे दागिने काढून घेत ते स्वत:च्या घरात लपवून ठेवले. तसेच हा प्रकार पाहिल्यामुळे त्याने स्वत:च्या आईवर देखील गोळी झाडून तिला मारण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालं. पोलिसांनी पवन म्हात्रेला अटक केली आहे. तर त्याने नेवाळी येथील मित्र जयेश जाधव याच्या ओळखीने मध्य प्रदेशातून अजय पवार याने आणलेले गावठी पिस्टल 25 हजार रुपयात खरेदी केल्याने या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.


दरम्यान पवनने हा गुन्हा अनैतिक संबध आणि सोन्याच्या ह्व्यासापोटी केल्याचे तपासात पोलिसांनी सांगितले. पोलीस सहाय्यक आयुक्त अनिल पोवार यांच्यासह खडकपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि अमलदार यांनी या प्रकरणाचा छडा साशा नामक श्वानाच्या मदतीने लावला.