Mumbai Crime : मल्टिनॅशनल कंपनीच्या 18 राज्यांमध्ये स्थापित केलेल्या 200 एटीएममध्ये (ATM) छेडछाड करुन तीन दिवसात अडीच कोटी रुपये लंपास केल्याची घटना समोर आली. चोरांनी पैसे लुटण्यासाठी नवीन पद्धत वापरली. या प्रकरणी मुंबईतील गोरेगावमधील वनराई पोलिसांनी (Vanrai Police) अज्ञात टोळीविरोधात गुन्ह्याची नोंद केली असून त्यांचा शोध सुरु आहे.


पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार 12 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2022 या तीन दिवसांत चोरी झाली. यासाठी विविध बँकांच्या 872 डेबिट कार्डचा वापर करण्यात आला आणि 2 हजार 743 वेळा आर्थिक व्यवहार करण्यात आले. या व्यवहारातून 2 कोटी 53 लाख 13 हजार इतकी रक्कम काढण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. दरम्यान कंपनीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर गोरेगावमधील वनराई पोलिसांनी शनिवारी (9 जून) या प्रकरणी भा.दं.वि कलम 420, 34 आणि माहिती तंत्रज्ञान कायदाच्या विविध कलामांतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. 


12 ऑक्टोबर 2022 रोजी फसवणुकीचा पहिला व्यवहार


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 ऑक्टोबर 2022 रोजी पहिला फसवणुकीचा व्यवहार झाला होता आणि त्याची गोरेगावमधील कंपनीच्या कॉर्पोरेट टीमला माहिती देण्यात आली होती. सुरुवातीला कंपनी आणि इतर कंत्राटी एजन्सींनी या घटनेची चौकशी केली होती. त्यानंतर, कंपनीच्या व्यवस्थापनातील एका अधिकाऱ्याने त्यावर्षी 20 डिसेंबर रोजी वनराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.


अशी होती आरोपींची मोडस ऑपरेंडी!


आरोपींच्या मोडस ऑपरेंडीबाबत पोलिसांनी सांगितलं की, आरोपी स्वत:चं डेबिट कार्ड वापरुन सामान्य प्रक्रिया सुरु करतात. त्यानंतर पैसे एटीएम डिस्पेन्सरी शटरपर्यंत पोहोचताच तिथे उपस्थित असलेली दुसरी व्यक्ती तिथली इलेक्ट्रिक वायर किंवा लॅन केबल ओढून वीजपुरवठा खंडित करतात, जेणेकरुन हा तांत्रिक बिघाड असल्याचं भासवलं जातं. त्याचवेळी पहिली व्यक्ती डिस्पेंसिंग शटरमधून पैसे खेचून काढून घेतो. तर तांत्रिक बिघाडामुळे मशीनमध्ये संबंधित व्यवहाराची नोंद होत नाही आणि पैसे पुन्हा ग्राहकाच्या बँक खात्यात पुन्हा जमा केले जातात. परिणामी कंपनीचं नुकसान होतं.


12 ते 14 ऑक्टोबर 2022 दरम्यान एटीएममधून पैसे काढले


अंतर्गत चौकशीदरम्यान या कंपनीच्या अधिकार्‍यांना समजलं की छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा, आसाम, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब आणि इतर नऊ  ठिकाणी बसवलेल्या कंपन्यांच्या एटीएम मशीनमधून 2.53 कोटी रुपये फसवणूक करुन काढण्यात आले आहेत. गेल्या वर्षी 12 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान आरोपींनी 872 डेबिट कार्डच्या सहाय्याने 2,53,13,100 रुपयांचे 2,743 व्यवहार केले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी एटीएम मशीनची हार्ड डिस्क आणि त्यांचे रेकॉर्ड तपासल्यानंतर काढलेली रक्कम, व्यवहारांची संख्या आणि वापरलेली डेबिट कार्डे उघडकीस आली," असं एफआरआयमध्ये नमूद केलं आहे.


पिनहोल कॅमेऱ्यात आरोपींचा चेहरा कैद


आरोपींनी मशीनमधून पैसे काढण्यापूर्वी एटीएम सेंटरमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये छेडछाड केली. यामुळे एटीएम सेंटरमध्ये बसवलेल्या कॅमेऱ्यांचे फुटेज उपलब्ध नव्हते. त्यामुळे प्रत्येक एटीएम मशीनमध्ये कॅमेरा बसवलेला असतो ज्याला पिनहोल कॅमेरा म्हणता, ज्यामध्ये मशीनमध्ये व्यवहार करणाऱ्या व्यक्तीचा चेहरा कॅप्चर केला जातो. या एटीएम मशीन्सच्या पिनहोल कॅमेऱ्यांत आरोपींचा चेहरा कैद करण्यात यश आलं. हे फुटेज पोलिसांकडे सादर केलं आहे," असं तक्रारदाराने पोलिसांना केलेल्या अर्जात म्हटलं आहे. तक्रार मिळाल्यानंतर वनराई पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.