Mumbai Crime News : मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) मुंबईतील सुप्रसिद्ध त्रिभोवनदास भीमजी झवेरी अँड सन्स ज्वेलर्सच्या प्रवर्तकाला अटक केली आहे. अॅक्सिस बँकेची (Axis Bank) 42.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. तसेच कर्जाच्या पैशाचा वापर इतर कारणांसाठी केल्याचे समोर आले.
कर्जाच्या पैशाचा इतर कारणांसाठी वापर
अॅक्सिस बँकेची 42.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईतील त्रिभोवनदास भीमजी झवेरी अँड सन्स रिटेल प्रायव्हेट लिमिटेड या ज्वेलरी कंपनीच्या प्रवर्तकाला अटक केली आहे. आरोपी ज्वेलर्सने कथितपणे खाजगी बँकेकडून कॅश क्रेडिट सुविधेचा लाभ घेतला. परंतु, कर्जाची परतफेड करण्यात कंपनी अयशस्वी ठरली. कंपनीच्या खात्यांच्या ऑडिटिमध्ये असे दिसून आले की, कंपनी आणि कंपनीच्या मालकाने कर्जाच्या पैशाचा वापर कंपनी संबंधित कामाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी केला होता.
गेल्या सहा महिन्यांपासून फरार
63 वर्षीय आरोपी ज्वेलर्स हेमंत व्रजलाल झवेरी यानं आपलं घर विकलं होतं, त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून तो फरार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, फरार झाल्यानंतर ज्या ठिकाणी तो अनेक महिने लपला होता, याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली, अखेर आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी सायंकाळी त्याला मुलुंड (पश्चिम) येथील फ्लॅटमधून अटक केली आहे.
बँकेच्या वाट्याला फसवणूक
मौल्यवान धातू आणि हिरे यांच्या विक्री आणि खरेदीसाठी आरोपीने 2015 मध्ये कॅश क्रेडिट सुविधेची एक्सिस बँकेकडे अर्ज केला होता. त्यानुसार, बँकेने सप्टेंबर 2015 मध्ये कंपनीने अटी व शर्ती मान्य केल्यानंतर 36 कोटी रुपयांची कॅश क्रेडिट सुविधा मंजूर केली होती. पहिल्या काही वर्षांत कंपनीने बँकेला कर्जाच्या मासिक हप्त्यांची नियमित परतफेड केली. परंतु मे 2019 पासून परतफेड बंद झाली. वारंवार तगादा लावून सुद्धा बँकेची फसवणूक समोर आली. अखेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कॅश क्रेडिट सुविधेचा लाभ घेतला
अॅक्सिस बँकेची 42 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बॅंकेने मुंबई पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने याचा तपास सुरू केली. तपासाअंती मुंबईतील त्रिभोवनदास भीमजी झवेरी अँड सन्स रिटेल प्रायव्हेट लिमिटेड या ज्वेलरी कंपनीच्या प्रवर्तकाला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपी ज्वेलर्सने खाजगी बँकेकडून कॅश क्रेडिट सुविधेचा लाभ घेतल्यानंतर तो सहा महिने फरार झाला होता.
संबंधित बातमी