मुंबई: मुलुंडमध्ये मराठी महिलेला (Mulund Viral Video) जागा नाकारल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक घटना समोर आली आहे. जय श्री रामचा नारा दिला नाही म्हणून परप्रांतीयांच्या एका टोळक्याने मराठी युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना कांदीवली पूर्वमध्ये (Kandivali East) घडली आहे. या मारहाणीचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झालं असून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनाी दोन जणांना अटक केली असून इतर दोन जणांचा शोध सुरू आहे. 


मुंबईच्या कांदिवली पूर्व परिसरातील गोकुळनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. परप्रांतीय तरुणांच्या चार जणांच्या टोळक्याने एका मराठी मुलाला 'जय श्रीराम'चा नारा देण्यास सांगितले. मात्र त्याने 'जय श्रीराम'चा नारा दिला नाही म्हणून या चार तरुणांकडून त्या मराठी मुलास बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या संपूर्ण मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 25 सप्टेंबरच्या रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. 


याप्रकरणी आता त्या चार जणांविरोधात कुरार पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी सूरज तिवारी (वय 30) आणि रोशन उर्फ कबीर मिश्रा यांना अटक केली आहे. अरुण पांडे आणि राजेश रिक्षाचालक हे दोन आरोपी सध्या फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. 


Kandivali Video : नेमकं काय झालं? 


सिद्धार्थ किसन अंगुरे असं मारहाण झालेल्या युवकाचं नाव आहे. तो कांदिवली पूर्व येथील क्रांतीनगरमध्ये राहतोय. सिद्धार्थ हा त्याच्या भावासोबत जात असताना चार परप्रांतीय युवकांनी त्याची वाट अडवली आणि त्याला जय श्री राम म्हणायला लावलं. त्याने त्याला नकार दिल्यानंतर त्या युवकांनी सिद्धार्थ आणि त्याच्या भावाला शिवीगाळ केली. त्यानंतर त्या चार जणांनी सिद्धार्थला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि फरफटत नेलं. मारहाण झाल्यानंतर या युवकाला रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर या युवकाची तक्रार नोंदवली. 


तक्रार नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चार जणांपैकी दोघांना अटक केली आहे तर फरार असलेल्या दोघांचा शोध सुरू आहे. 


एकीकडे मुलुंडमध्ये मराठी महिलेला जागा दिली नसल्याच्या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच आता मराठी युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडल्यामुळे अधिकच संताप व्यक्त केला जात आहे.


ही बातमी वाचा: