Mumbai Court On Act Of God : परेश रावल आणि अक्षय कुमार यांचा 'ओ माय गॉड' हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल... अ‍ॅक्ट ऑफ गॉड या विमा कंपनीच्या नियमांवर हा चित्रपट आहे. या चित्रपटात अ‍ॅक्ट ऑफ गॉड या विमा कंपनीच्या नियमांविरोधात कोर्टातील लढा दाखवण्यात आला आहे. असाच काहीसा प्रकार मुंबईतही घडला.. विमा कंपनी अ‍ॅक्ट ऑफ गॉड या नियमाचा आधार घेत नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करत होती. पण मुंबई उच्च न्यायालयाने विमा कंपनीला झापत नुकसान भरपाई करण्याचे आदेश दिले. 


मुंबईमध्ये कोर्टात रस्ते अपघाताच्या एका प्रकरणाची सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने टायर फुटणे हे देवाचे कृत्य नसून मानवी निष्काळजीपणा आहे, अशी टिप्पणी केली. एका विमा कंपनीने रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याविरोधात याचिका दाखल केली होती. कोर्टाने ही याचिका  फेटाळून लावली. तसेच विमा कंपनीला नुकसान भरपाई करण्याचे आदेश दिले. 


न्यायमूर्ती एसजी डिगे यांच्या एकल खंडपीठाने 17 फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशात, न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेडने मोटर अपघात दावा न्यायाधिकरणाच्या 2016 च्या निवाड्याविरुद्ध दाखल केलेले अपील फेटाळून लावले. यामध्ये पीडित मकरंद पटवर्धनच्या कुटुंबाला 1.25 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले.  25 ऑक्टोबर 2010 रोजी पटवर्धन हे दोन जणांसोबत कारमधून पुण्याहून मुंबईकडे येत होते. त्यावेळी कारच्या मागील चाकाचा टायर फुटला. त्यामुळे कार खड्ड्यात पडली. या अपघातात पटवर्धन यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबियांनी विमा कंपनीकडे इन्शुरन्सची रक्कम मागितली. पण विमा कंपनीने हा अॅक्ट ऑफ गॉड आहे, असे म्हणत रक्कम देण्यास नकार दिला... त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले होते. 


कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले होते की, पीडिता ही त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती आहे. त्याच वेळी, विमा कंपनीने आपल्या अपीलात म्हटले होते की नुकसान भरपाईची रक्कम जास्त आहे. टायर फुटणे हे ईश्वराचे कृत्य आहे आणि चालकाच्या निष्काळजीपणाचे परिणाम नाही. त्यावेळी, उच्च न्यायालयाने हे अपील स्वीकारण्यास नकार दिला. न्यायमुर्तींनी सांगितलं की, शब्दकोषातील ऍक्ट ऑफ गॉडचा अर्थ ऑपरेशनमध्ये अनियंत्रित नैसर्गिक शक्तींचे उदाहरण आहे. या घटनेतील टायर फुटणे ही देवाची कृती म्हणता येणार नाही. हा मानवी निष्काळजीपणा आहे.  


कोर्टाने पुढे सांगितले की, "टायर फुटण्याची अनेक कारणे आहेत. जसे की जास्त वेग, कमी वारा, जास्त वारा किंवा सेकंड हँड टायर आणि तापमान."  प्रवास करण्यापूर्वी गाडीच्या चालकाने टायर्सची स्थिती तपासली पाहिजे. टायर फुटणे ही नैसर्गिक क्रिया म्हणता येणार नाही. हा मानवी निष्काळजीपणा आहे.  टायर फुटणे हा अ‍ॅक्ट ऑफ गॉड म्हणता येणार नाही नाही. त्यामुळे विमा कंपनीला नुकसान भरपाई देण्यापासून मुक्त करता येणार नाही. विमा कंपनीने नुकसान भरपाई करावी.