Coronavirus Maharashtra : राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात मुंबईतील कोरोना रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळेच टास्क फोर्स पुन्हा एकदा कार्यरत झालेय. टाक्स फोर्सचे सदस्य राहुल पंडित यांनी कोरोनाला रोखण्यासाठी काही सल्ले दिले आहेत.
महाराष्ट्रत 1000 पेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण आढळतात. मुंबई सुद्धा सातशेच्यावर दैनंदिन रुग्णसंख्या आहे. यामध्ये महत्त्वाचं हे बघितलं पाहिजे की यातील गंभीर रुग्ण नेमके किती आहेत आणि त्यांना त्यानुसार उपचार द्यायला हवेत. मात्र, सध्यातरी जे रुग्ण आढळतात त्यातील बहुतांश रुग्ण हे माईल्ड आहेत. आता नव्याने वाढणारी रुग्ण संख्या कमी करायची असेल तर मास्क वापरायलाच हवा. ज्या ठिकाणी बंदिस्त ठिकाणे आहेत, तिथे गर्दी असेल, जसे की ऑफिस, सभागृह येथे मास्क वापरणे आवश्यक आहे. शिवाय, कोरोनाची वाढत्या रुग्णसंख्या बघता वयोवृद्ध, हाय रिस्क पेशंट, डायलिसिस वरील पेशंट यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे ... त्यांना सर्वाधिक धोका आहे. मास्क आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी वापरण्याची सवय लावणे गरजेचे आहे. कमीत कमी आपल्या सुरक्षेसाठी तरी मास्क वापरा. काही दिवसांत पावसाळा सुरु होतोय. त्यामुळे हंगामी रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन निदान करणे गरजेचं आहे, असे राहुल पंडित म्हणाले.
केंद्राचं राज्य सरकारला पत्र -
कोरोना रूग्ण संख्या वाढत असल्याने केंद्रिय आरोग्य विभागाने राज्य सरकारला पत्र पाठवले आहे. मुंबई,मुंबई उपनगर,ठाणे पुणे रायगड,पालघर या जिल्ह्यातील रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे, असे पत्रात नमूद केलेय. या जिल्ह्यात टेस्टिंग,लसीकरण वाढवणे यावर अधिक भर द्यावा. तसेच नवीन कोरोना व्हेरियंट यावर लक्ष द्यावे, असेही सांगण्यात आलेय.
तिसऱ्या दिवशी एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले -
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शुक्रवारी 563 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत एकूण 77,37,355 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.06% एवढे झाले आहेत. राज्यात आज तीन करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87% एवढा आहे. राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या पाच हजार 127 इतकी झाली आहे. ओमायक्राॅन व्हेरीयंटचे बीए४ आणि बीए५ सब-व्हेरीयंटचा वेगाने प्रसार होत असल्याचं तज्ज्ञांनी निरीक्षण नोंदवलेय. राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्णांची संख्या मुंबईत आहे. मुंबईत सध्या 3735 सक्रीय रुग्ण आहे. राज्याच्या 60 टक्के सक्रीय रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. ठाणे 658, रायगड 108 आणि पुण्यात 409 सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबईत आज 763 कोरोना रुग्न आढळले आहेत. तर ठाणे मनपा 77, नवी मुंबई 71, पुणे मनपा 72 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.