मुंबई : 'कोविड-19' या आजाराच्या संसर्गाचे विश्लेषण करताना त्यात रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीची आणि रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची दैनंदिन सरासरी टक्केवारी, या दोन आकडेवारी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. रुग्ण दुप्पट होण्याचा दिवस म्हणजेच कालावधी जेवढा अधिक तेवढी सदर बाब अधिक सकारात्मक असते, तर त्याचवेळी रुग्णांमध्ये वाढ होण्याची दैनंदिन सरासरी टक्केवारी जेवढी कमी तेवढी परिस्थिती चांगली असल्याचे निदर्शक असते.
याच अनुषंगाने कोविड प्रतिबंधासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्वंकष आणि सर्वस्तरीय प्रयत्नांना यश येत असल्याचे नुकत्याच उपलब्ध झालेल्या सदर दोन्ही आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. या आकडेवारीनुसार रुग्ण दुप्पट होण्याच्या सरासरी कालावधीने आज 'चाळीशी' ओलांडली असून 24 जून 2020 रोजी दिवसा अखेरीच्या आकडेवारीनुसार, हा कालावधी तब्बल 41 दिवसांवर पोहोचला आहे. हाच कालावधी 16 जून रोजी 30 दिवस एवढा होता. म्हणजेच साधारणपणे 10 दिवसांच्या कालावधीत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा 30 दिवसांवरुन 41 दिवसांवर पोहचला आहे.
तर याच वेळी रुग्ण संख्येत होणाऱ्या दैनंदिन वाढीची सरासरी टक्केवारी ही देखील दिवसेंदिवस कमी होत असून, 17 जून रोजी 2.30 टक्के असणारी ही टक्केवारी, आता 1.72 टक्क्यांवर आली आहे. एकीकडे रुग्ण दुपटीच्या कालावधीत सकारात्मक वाढ नोंदविली जात असतानाच, रुग्ण वाढीच्या दैनंदिन सरासरी टक्केवारीतही दररोज सकारात्मक घट नोंदविली जात आहे. या दोन्ही बाबी मुंबईकरांसाठी निश्चितच दिलासादायक आहेत.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात 11 मार्च 2020 रोजी कोविडचा पहिला रुग्ण आढळून आला होता. 'संसर्गजन्यता'ही तुलनेने अधिक असणाऱ्या या आजाराला प्रतिबंध करणे, हे लोकसंख्येची घनता अधिक असणाऱ्या बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रासारख्या परिसरापुढे मोठे आव्हानच होते आणि आहे. तथापि, या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाद्वारे सर्वस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देतानाच वैदयकीय उपचार विषयक आवश्यक ती कार्यवाही देखील सातत्यपूर्ण पद्धतीने केली जात आहे. परिणामी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोना संसर्गास परिणामकारकरित्या आळा घालणे शक्य होत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन दिसून येत आहे.
पाहा व्हिडीओ : राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय, 28 जूनपासून राज्यात सलून उघडण्यास परवानगी
रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीत सकारात्मक वाढ
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्ण दुप्पट होण्याच्या दिवसांमध्ये सकारात्मक वाढ सातत्याने नोंदविली जात आहे. 22 मार्च 2020 रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी केवळ 3 दिवस होता. याचाच अर्थ 22 मार्च रोजी रुग्णांची असणारी संख्या तीन दिवसात दुप्पट होत होती. त्यानंतर 15 एप्रिल 2020 रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 5 दिवस एवढा नोंदविण्यात आला. दिनांक 12 मे 2020 रोजी हाच कालावधी अधिक सकारात्मक होत तो 10 दिवसांवर पोहचला. तर याच महिन्यात म्हणजेच 2 जून 2020 रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी 20 दिवसांवर; आणि 16 जून रोजी 30 दिवस एवढा नोंदविण्यात आला. तर नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार दिनांक 24 जून 2020 रोजी दिवस अखेरीस या कालावधीत अधिक सकारात्मक वाढ नोंदविण्यात येऊन हा कालावधी तब्बल 41 दिवसांवर पोहचला आहे. ही बाब सर्वच मुंबईकरांना निश्चितपणे दिलासा देणारी आहे. ही आकडेवारी 24 प्रशासकीय विभागांच्या गेल्या 7 दिवसांतील आकडेवारीच्या विश्लेषणावर आधारित आहे.
वांद्रे पूर्व आणि खार पूर्व इत्यादी परिसरांचा समावेश असलेल्या 'एच पूर्व' विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी तब्बल 97 दिवस एवढा झाला आहे. तर या खालोखाल प्रामुख्याने माटुंगा परिसराचा समावेश असलेल्या 'एफ उत्तर' विभागात 91 दिवस इतका आहे.
भायखळा परिसराचा समावेश असलेल्या 'ई' विभागात 76 दिवसांवर हा कालावधी आहे.
कुर्ला परिसराचा समावेश असलेल्या 'एल' विभागात 73 दिवसांवर आहे.
तर फोर्ट - कुलाबा या परिसरांचा समावेश असलेल्या 'ए' विभागात 69 दिवस एवढा झाला आहे.
रुग्णांच्या दैनंदिन सरासरी वाढीत सकारात्मक घट
मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्णांची वाढ होण्याच्या प्रती 100 रुग्णांमागील दर हा जेवढा कमी असेल तेवढे सकारात्मक व चांगले असल्याचे द्योतक आहे. 17 जून 2020 रोजी दिवसाअखेरीस हा दर सरासरी 2.30 टक्के एवढा होता. या दरात आता 'सकारात्मक घट' नोंदविण्यात आली असून हा दर आता सरासरी 1.72 टक्के एवढा झाला आहे. तर विभागस्तरीय आकडेवारीचा विचार केल्यास सर्वात कमी दर हा 'एच पूर्व' विभागामध्ये 0.7 टक्के एवढा नोंदविण्यात आला आहे. या खालोखाल 'एफ उत्तर' विभागात 0.8 टक्के आणि 'ई' विभागात 0.9 टक्के एवढा नोंदविण्यात आला आहे. सर्व 24 विभागांपैकी 17 विभागांमधील सरासरी दैनंदिन रुग्णवाढीचा हा 2 टक्क्यांपेक्षा कमी आहे, उर्वरित 7 विभागांपैकी 5 विभागांमध्ये हा दर 3 टक्क्यांपेक्षा कमी, तर 2 विभागांमध्ये हा दर 4 टक्क्यांपेक्षा कमी नोंदविण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
गेल्या 24 तासांत मुंबई पोलीस दलामध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू
रुग्णालयाबाहेर झालेले मुंबईतील 1000 मृत्यू का दडवले? देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
वर्क फ्रॉम होममुळे मुंबईकरांचा आजार बळावतोय; बैठ्या कामामुळे 40 वर्षीय व्यक्तीच्या मणक्यात गाठ