मुंबई :  राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून वाढत्या करोनासंसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. १५ दिवस राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून आधी विकेंड लॉकडाउनमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. परंतु तरीही संचारबंदीच्या काळातही विनाकारण घराबाहेर पडून आणि रस्त्यावर वाहतूक कोंडी करणाऱ्या मुंबईकरांवर आता पोलिस कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. उद्यापासून मुंबईत खासगी वाहनांसाठी कलरकोड सिस्टम लागू होणार आहे. मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह माहिती दिली.


 कलर कोड सिस्टमनुसार वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या गाड्यांसाठी लाल रंगाचं वर्तुळ लावणं बंधनकारक असेल. भाजीपाल्याच्या गाड्यांसाठी हिरव्या रंगाचं तर इतर अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी पिवळ्या रंगाचं वर्तुळ असणं अनिवार्य करण्यात आलंय. मुंबईत होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी हा खबरदारीचा उपाय अंमलात आणण्याचं ठरवलंय. दरम्यान, कलरकोडचा गैरवापर केल्यास 419 कलमाखाली गुन्हा दाखल करणार असल्याची एक्स्क्लुझिव्ह माहिती मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळेंनी एबीपी माझाला दिली आहे.


 राज्यात कोरोनाचा प्रकोप थांबायचं नाव घेत नाहीय. काल राज्यात सर्वाधिक  63,729 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 45,335 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मुंबई महानगरपालिका क्षेत्रात काल 8803 रुग्णांची नोंद झाली आहे.


 राज्यात एकूण 30,04,391 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 81.12 एवढे झाले आहे. राज्यात काल 398 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्युंची नोंद झाली असून राज्यातील मृत्युदर 1.61 एवढा झाला आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,33,08,878 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 37, 03, 584   नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 35, 14, 181  व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 25,168 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 6, 38, 034 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.