मुंबई : महाराष्ट्र सरकारने अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या कंपन्यांमधील कामगारांना कोरोना टेस्टिंग करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार रबाले एमआयडी मधील  कंपन्यांनी केलेल्या कोरोना टेस्टिंगचे बोगस रिपोर्ट तयार करणाऱ्या तीन जणांना पोलीसांनी अटक केले आहे. कोरोना रिपोर्टमधील QR code स्मार्ट फोनने scan करून पडताळणी करा असा सल्ला तज्ञांनी दिलाय. 


रबाले एमआयडीसीमध्ये असलेल्या परविन इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या 133 कामगारांची कोरोना टेस्ट केली होती. 133 कामगारांच्या RTPCR टेस्ट करण्यासाठी मिडटाऊन लॅब ठाणे, परफेक्ट हेल्थ पॅथॉलॉजी कल्याण यांना बोलवण्यात आले होते. या दोन्ही लॅबने आपले  थायरोकेअर लॅब बरोबर टायअप असल्याचे परविन कंपनी व्यवस्थापनाला सांगितले होते. RTPCR टेस्ट केल्यानंतर मिडटाऊन लॅब आणि परफेक्ट लॅबने सर्व कामगार निगेटीव्ह असल्याचे रिपोर्ट परवीन कंपनीला दिले होते. 133 कामगारांचे सर्वच निगेटीव्ह कसे, हा संशय आल्यानंतर QR Code तपासला असता थायरोकेअर लॅबचे बोगस लेटरहॅड तयार करून खोटे रिपोर्ट दिल्याचे परवीन इंडस्ट्रीज कंपनीच्या लक्षात येताच त्यांनी पोलीसांकडे धाव घेतली. 


सध्या कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरल्याने सरकारी लॅबवर प्रचंड ताण आला आहे. यामुळे अनेक जणांनी खाजगी लॅबकडून आपल्या RTPCR कोरोना टेस्ट करून घेतल्या आहेत. मात्र मिळालेले रिपोर्ट खरे की खोटे असा संशय निर्माण होवू लागला आहे. हा संशय दूर करण्यासाठी कोरोना रिपोर्ट वर असलेला QR code स्मार्ट मोबाईलने scan करण्याचा सल्ला तज्ञांनी दिलाय. Scan करताच खरी माहिती समोर येत असल्याने बोगस रिपोर्टचा भांडाभोड करण्यास मदत होणार आहे. 


बोगस कोरोना  रिपोर्ट तयार करून आरोग्य यंत्रणेशी खेळणाऱ्या मिडटाऊन लॅब, परफेक्ट लॅबच्या तीन मालकांना रबाले एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. आरोपींनी अनेक कंपन्यांच्या कामगारांची RTPCR टेस्ट करून 300 च्या वर कोरोनाचे बोगस रिपोर्ट दिल्याचे समोर आले आहे.