मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये महानगरपालिकेच्‍या सर्व रुग्‍णालयांमध्‍ये तसेच शासकीय रुग्‍णालयांत लसीकरणाचा वेग अत्‍यंत चांगला असला तरी खासगी रुग्‍णालयांमध्‍ये लसीकरणाचे प्रमाण तुलनेने अत्‍यल्‍प आहे. लसीकरणासाठी निर्देशित खासगी रुग्‍णालयांची संख्‍या वाढविण्‍यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. ही संख्‍या वाढताच दररोज किमान 1 लाख याप्रमाणे 45 दिवसांत 45 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्‍याचे उद्द‍िष्‍ट आहे. प्रत्‍येक खासगी रुग्‍णालयाने दररोज किमान1 हजार पात्र नागरिकांचे लसीकरण करणे आवश्‍यक आहे. त्‍यासाठी स्‍थानिक नगरसेवकांसह वेगवेगळ्या सामाजिक, सेवाभावी संस्‍थांची मदत घ्‍यावी, अशी सूचना बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्‍त  इकबाल सिंह चहल यांनी केली आहे.


मागील काही दिवसांमध्‍ये सर्वत्र कोविड-१९ रुग्‍णांची संख्‍या पुन्‍हा एकदा वाढू लागली आहे. यामुळे आरोग्‍य  यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये देखील कोविड रुग्‍ण संख्‍येचा आलेख वाढू लागल्‍याने बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने विविध उपाययोजना केल्‍या आहेत. त्‍यामध्‍ये खासगी रुग्‍णालयांचे देखील सहकार्य मिळण्‍याच्‍या दृष्‍टीने, बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध खासगी रुग्‍णालयांसह‍ महानगरपालिकेच्‍या सर्व रुग्‍णालयांची महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांनी काल दूरदृश्‍य प्रणालीद्वारे विशेष बैठक घेतली. त्‍यावेळी ते बोलत होते. विशेषतः कोविड-१९ रुग्‍णशय्या व्‍यवस्‍थापन तसेच लसीकरण या दोन्‍ही बाबींवर आयुक्‍तांनी निरनिराळ्या सूचना केल्‍या. या बैठकीला महानगरपालिकेचे सर्व अतिरिक्‍त आयुक्‍त, संबंधित सहआयुक्‍त, उपआयुक्‍त, सहायक आयुक्‍त तसेच रुग्‍णालयांचे अधिष्‍ठाता व प्रमुख उपस्थित होते. 


चहल म्‍हणाले की,  मागील कालावधीच्‍या तुलनेत मृत्‍यू दराचे हे प्रमाण कमी असले तरी एकंदरीत कोविड मृत्‍यू दर शून्‍यावर आणण्‍यासाठी तसेच कोविड-१९ बाधेची तीव्रता कमी करण्‍यासाठी लसीकरण हे अत्‍यंत महत्‍त्‍वाचे आहे, असे सांगून त्‍यांनी कोविड-१९ लसीकरणाच्‍या दृष्‍टीने सूचना केल्‍या. 


मुंबईमध्‍ये सद्यस्थितीत एकूण 59 खासगी रुग्‍णालयांना कोविड-19  लसीकरणासाठी निर्देशित करण्यात आले आहे. असे असले तरी या रुग्‍णालयांमध्‍ये लसीकरणाचे प्रमाण अत्‍यल्‍प म्‍हणजे सर्व मिळून दररोज फक्‍त 4  हजार इतके आहे. यामुळे प्रत्‍येक खासगी रुग्‍णालयाने दररोज किमान 1 हजार पात्र नागरिकांना लस देण्‍याचे उद्द‍िष्‍ट निश्चित करुन त्‍याप्रमाणे कार्यवाही केली पाहिजे.


लस घेण्‍यासाठी प्रोत्‍साहित करण्‍यासाठी तसेच जवळच्‍या संबंधित खासगी रुग्‍णालयांमध्‍ये नागरिकांनी लसीकरणासाठी यावे, म्‍हणून खासगी रुग्‍णालयांनी रोटरी, लायन्‍स यांच्‍यासारख्‍या सामाजिक व सेवाभावी संस्‍थांची मदत घ्‍यावी.


 लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणताही त्रास होवू नये, यासाठी लसीकरणाचे जास्‍तीत जास्‍त बूथ करावेत. तसेच पुरेशी जागा, पिण्‍याचे पाणी, चहा-कॉफी, बैठक व्‍यवस्‍था आदी बाबींची पूर्तता करावी. लसीकरणासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नेमावा, म्‍हणजे कोणालाही जास्‍त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. पहिला व दुसरा डोस घेणाऱया नागरिकांसाठी स्‍वतंत्र कक्ष करावेत. जेणेकरुन लवकर लस देता येईल. गर्दी होणार नाही. 


मुंबईतील जीवनशैली व कार्यालयीन वेळा लक्षात घेता, खासगी रुग्‍णालयांनी लसीकरणाची वेळ सकाळी 9 ते रात्री 9 अशी केल्‍यास अधिकाधिक नागर‍िक लस घेवू शकतील. शक्‍य असल्‍यास आणि पुरेशी व्‍यवस्‍था करणे शक्‍य असेल तर 24 तास लसीकरणाची सोय करण्‍याचाही पर्याय विचारात घ्‍यावा. नागरिकांनी देखील वेळेची खात्री करुन लसीकरणासाठी पोहोचावे.


 मुंबईत महानगरपालिकेचे 24 व शासकीय 8 असे मिळून 32 रुग्‍णालये दररोज किमान 41 हजार जणांना लस देतात. तर खासगी रुग्‍णालयांत फक्‍त 4 हजार जणांना दररोज लस दिली जाते. महानगरपालिकेच्‍या व शासकीय रुग्‍णालयांमध्‍ये करण्‍यात आलेल्‍या व्‍यवस्‍था व व्‍यवस्‍थापनाचे मुंबईकरांनी भरभरुन कौतुक केले आहे. त्‍यामुळे खासगी रुग्‍णालयांनी लसीकरणाचा वेग वाढवावा, जेणेकरुन मुंबईतील सर्व पात्र नागरिक, फ्रंटलाईन वर्कर्स आदी सर्वांना लस लवकरात लवकर मिळू शकेल.


 मुंबईत लसीकरणासाठी निर्देशित खासगी रुग्‍णालयांची संख्‍या सध्‍याच्‍या 59 वरुन 80 पर्यंत नेण्‍यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. ही मंजुरी प्राप्‍त होताच सर्व सरकारी व खासगी रुग्‍णालये मिळून दररोज किमान १ लाख नागरिकांना लस देण्‍याचे नियोजन करण्‍यात येईल. 45 दिवसांमध्‍ये पात्र अशा 45 लाख नागरिकांना लसीकरण पूर्ण करुन कोविड-१९ संसर्गाला वेळीच लगाम घालण्‍याचे प्रयत्‍न एकत्रितपणे करावयाचे आहेत.


 रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या कोविशिल्‍ड आणि कोवॅक्सिन या दोन्‍ही लसींची परिणामकारकता सारखीच असून त्‍यांच्‍याबाबत नागरिकांनी चिंता बाळगण्‍याचे कारण नाही. ज्या लसीचा पहिला डोस घेतला असेल, त्याचाच दुसरा डोस घ्यावा लागणार असून त्याप्रमाणे लस उपलब्धतेचे नियोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक पात्र मुंबईकर नागरिकांनी लसीकरण करुन घ्‍यावे. मुंबईतील लसीकरणासाठी निर्देशित खासगी रुग्‍णालयांची माहिती नागरिकांपर्यंत वेगवेगळ्या माध्‍यमातून पोहोचविण्‍यात येईल. त्‍यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्‍न करावेत.